Friday, June 5, 2026
HomeराजकीयRupali Thombare-Patil : पत्रकारांच्या मदतीने माझी बदनामी करण्यासाठी २५ लाखांची 'डील'; अ‍ॅड....

Rupali Thombare-Patil : पत्रकारांच्या मदतीने माझी बदनामी करण्यासाठी २५ लाखांची ‘डील’; अ‍ॅड. रुपाली ठोंबरे-पाटील यांचा खळबळजनक आरोप

पुणे (प्रतिनिधी)

भोंदू बाबा खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी एका महिलेने आणि काही पत्रकारांनी मिळून कट रचल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या अ‍ॅड. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केला आहे. आपल्याला महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची ‘डील’ करण्यात आली होती, असा दावा त्यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

रुपाली ठोंबरे-पाटील यांनी यावेळी पत्रकार रोहन कदम आणि त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांवर थेट निशाणा साधला. पक्षात स्थान नसलेल्या एका महिलेने या पत्रकारांना हाताशी धरून आपल्याला लैंगिक शोषण प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचले होते, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला. मात्र, एका अनपेक्षित घटनेमुळे हा संपूर्ण बदनामीचा कट उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.

या कटाचा भाग म्हणून संबंधित पत्रकारांनी बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये जाऊन एका महिलेचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शूटिंग सुरू असताना त्या महिलेला संशय आला आणि तिने संबंधित पत्रकाराला चप्पलने मारहाण केली. या गोंधळामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आणि आपला बदनामीचा कट फसला, असे ठोंबरे-पाटील यांनी नमूद केले.

संबंधित पत्रकार रोहन कदम हा पोलीस ठाण्यात जाऊन आपण ‘स्टिंग ऑपरेशन’साठी गेलो होतो, असा बनाव रचत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात हे स्टिंग ऑपरेशन नसून आपल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता, असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य तीन पत्रकारांची नावे देखील त्यांनी पोलिसांना दिली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ज्या लॉजमध्ये हा प्रकार घडला, त्याबाबत स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, तो लॉज त्यांच्या नातेवाईकाचा असला तरी तो गेल्या २० वर्षांपासून भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. त्या व्यवसायाशी किंवा तिथे घडणाऱ्या गोष्टींशी आपला कोणताही कायदेशीर संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी या जागेचा वापर करण्यात येत होता, असा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणावर अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनीही भाष्य केले. संबंधित पत्रकारांवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी राजकीय स्तरावरून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून, जर तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरात नवे पोलीस अधिकारी, काहींना मुदतवाढ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अशा...