नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरु आहे. आता हे युद्ध घातक वळणावर आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉलोदिमीर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियाने चेर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोनने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाने ड्रोनच्या मदतीने हल्ला करून चेर्नोबिल न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य केले आहे. रशियन ड्रोनने चेर्नोबिलच्या बंद केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याने जागतिक आण्विक सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. या इमारतीवर ड्रोन अदळल्याने स्फोट आणि आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (१४ फेब्रुवारी) घडल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. जगाला घातक किरणोत्सर्गापासून वाचवणार्या इमारतीवर शक्तिशाली बॉम्ब असलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला. त्यांनी या हल्ल्याची निंदा करत ही एक दहशतवादी कारवाई असल्याचे म्हटले आहे. तसेच अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचे धोकादायक परिणाम देखील नमूद केले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर सांगितले की, गुरुवारी रात्री रशियाच्या ड्रोनने चर्नोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने तातडीने उपाययोजना केली. त्यामुळे गळती रोखली गेली. उच्च-स्फोटक वॉरहेडसह रशियाकडून हा ड्रोन हल्ला झाला. रशियाकडून आतापर्यंत चौथ्या पॉवर युनिटवर हल्ला करण्यात आला. झेलेन्स्की यांनी भर दिला की अशा हल्ल्यांमुळे जागतिक सुरक्षा बिघडू शकते आणि त्वरित प्रतिसाद आवश्यक आहे.
दरम्यान या घटनेनंतर IAEA ने माहिती दिली की, एनएससीच्या अंतर्गत भागाला या हल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही आणि प्रकल्पाच्या आत आणि बाहेर किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आणि स्थिर आहे. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षा दरम्यान अणुउर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
https://twitter.com/iaeaorg/status/1890290202599633111
इतिहासातील सर्वात भयानक अणु अपघात मानल्या जाणाऱ्या चेरनोबिल आपत्तीत ३१ लोकांचा तात्काळ मृत्यू झाला. यामध्ये स्वच्छते दरम्यान तीव्र किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊन मृत्युमुखी पडलेल्या २८ कामगार आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेमुळे कर्करोगामुळे हजारो लोकांचा अकाली मृत्यू झाला असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे किरणोत्सर्ग वर्षानुवर्षे पसरत राहिले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा