Thursday, May 2, 2024
Homeनगरगंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

टाळ आणि मृदूंंगाचा निनाद… भगव्या पताकांची दाटी…जय हरिचा नामघोष… अशा मंगलमय वातावरणात सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज 174 वा अखंड हरिनाम सप्ताहाची काल श्रीक्षेत्र सराला बेट येथे सांगता झाली. या विलोभनीय सोहळ्याला हजेरी लावण्याची इच्छा झाली असावी, म्हणून वरुण राजानेही दिवसभर हजेरी लावली. संथ वाहणार्‍या गोदामाईनेही सराला बेटाच्या भुमिला स्पर्श करून जणु हरिनामाचा आनंदच घेतला.

- Advertisement -

या सप्ताहाच्या सांगतेस आ. लहु कानडे, आ. प्रा. रमेश बोरणारे, सप्ताह समितीचे अध्यक्ष साबेरभाई खान, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, बाबासाहेब कोते, इंद्रनाथ थोरात, वंदना मुरकुटे, डॉ. धनंजय धनवटे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, बाबासाहेब चिडे, गंगापूरचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती अविनाश गलांडे, कमलाकर कोते, गंगापूरच्या नगराध्यक्षा वंदना पाटील,अंबादास ढोकचौळे, विशाल संचेती, दिनेश परदेशी, नंदूशेट संचेती, सुभाषराव गमे, मच्छिंद्र चोळके, गोरक्षनाथ नालकर, बाळासाहेब महाराज रंजाळे, मधुकर महाराज, चंद्रकांत सावंत महाराज, महेंद्र महाराज निकम, विजय महाराज चौधरी, भोलु उदावंत पुणतांबेकर, बबनराव मुठे यांचेसह भाविक उपस्थित होते.

सदगुरू गंगागिरी महाराज यांनी ज्या परंपरेला प्रारंभ केला, ती परंपरा आजतागायत चालू आहे. कितीही अडचणी आल्या तरी सप्ताह चालू राहील. करोना अथवा पाऊस असो नाहीतर काही, ही परंपरा अखंडीत चालू राहील. सदगुरू गंगगिरी महाराजांनी सप्ताह सुरू केला तेव्हा देश स्वतंत्र नव्हता. देश पारतंत्र्यात असतानाही सप्ताह चालू होता. प्रभावीपणे परमार्थ त्यांनी चालविला होता. आता आपण स्वतंत्र भारतात आहोत. आपल्यावर सदगुरू गंगागिरी महाराजांचे संस्कार आहेत. गावोगावी सप्ताह असतात, वडगावपानमध्ये सप्ताह श्रावणात असतो, तो गंगागिरी महाराजांनी सुरू केला. तो अखंडपणे सुरू आहे. भक्ती अशी गोष्ट तीचा विट येत नाही. संसारात काही काही काळ सुख आहे परंतु नंतर विट येतोच. परमार्थात विट येत नाही. संसारात बाप लहान वयात चांगला सांभाळतो, कारण म्हतारपणी मुलगा आपल्याला सांभाळील. संसारात स्वार्थी लोक तर परमार्थात निःस्वार्थी लोक आहेत. खरे प्रेम, सुख परमार्थात आहे. स्वत: आनंद घ्या, दुसर्‍यालाही द्या, हे परमार्थात आहे.

आपल्या अडीच तासांच्या सांगतेच्या काल्याच्या किर्तनात श्रीकृष्णाच्या चरित्रावर महंत रामगिरी महाराज यांंनी कीर्तन केले. ये दशे चरित्र केले नारायणे। रांगता गोधने राखिताहे॥ या संत तुकाराम महाराजांच्या गौळण निरुपणास घेत त्यावर कीर्तन केले. वारकरी सांप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. काला हा एकमेकांना वाटून खायचा असतो, जीव ब्रम्ह ऐक्य रुपी काला आहे. भगवान गोकुळात तर संत आपल्यासाठी काला करतात. दुर्जनाचा संहार करण्याकरिता भगवंताचा आवतार असतो. दुसर्‍याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. तर दुसर्‍याला दु:ख देतो तो कंस! दुसर्‍याच्या सुखाचा नाश करतो म्हणून भगवंताने कंसाचा नाश केला.

संसारातही असा एक वर्ग आहे. त्यांना दुसर्‍याचे सुख बघवत नाही, दुसर्‍याच्या सुखाचा नाश करू नये, म्हणून भगवंताने कंसाचा नाश केला. दुसर्‍याला आनंद देणारांना भगवंताकडे जावे लागत नाही तर भगवंत त्याच्याकडे येतात. भगवंत गोकुळात प्रकट झाले. यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा! नंद म्हणजे आनंद! जो जगाला देतो. भगवंत गोकुळात प्रकट होतात, त्यानंतर गोकुळात झालेल्या आनंदाचे, शिव आणि विष्णू यांचे मिलनाचा प्रसंग महंत रामगिरी महाराजांनी आपल्या खास शैलीत वर्णन केला.

जसे आपण भगवंतावर प्रेम करतो, तसे भगवंत आपल्यावर करतात. गोकुळातील गोपिकांचे प्रेमाचे वर्णन करत महाराज म्हणाले, कृष्णाने चोर्‍या केल्या नाही तर चौर्य लिला केल्या. चोरी करणे अपराध आहे. चोरी करणारा दंडास पात्र असतो. भगवंताने चौर्य लिला केल्या. लिला या आनंदाकरिता असतात. प्रेमाच्या चोरीत, भांडणातही आनंद असतो. लोणी हे माध्यम आहे. लोण्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या चित्ताची चोरी करतो.

बेटाकडे येणारे रस्ते डांबरी करु- आ. बोरणारे

सराला बेटाकडे येणार्‍या रस्त्यावर वैजापूरजवळ ना. एकनाथ शिंदे यांच्या निधीतून 40 लाख रुपयांची कमान उभारणी सुरु आहे. बेटाकडे येणारे श्रीरामपूरचे रस्ते आ. कानडे यांनी करावेत, मी वैजापूर तालुक्यात येणारे रस्ते डांबरी करतो. लाडगाव ते वांजरगाव रस्ता रुंद करून तो मुख्यमंत्री निधीतून झालेला असेल. ना. अदित्य ठाकरे यांच्याकडून 5 कोटी रुपयांचे भव्य दिव्य गार्डन आणि एक कोटी रुपयांची कमान उभारण्यासाठी आग्रह धरला असल्याचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी सांगितले.

पुढील सप्ताहाची मागणी

पुढील वर्षीचा सप्ताहासाठी नेवासा येथील माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, कडूभाऊ काळे, एकनाथ पवार यांनी मागणी केली. तर येवला येथील कापसे पैठणीचे बाळकृष्ण कापसे यांनी येवला तालुक्याच्यावतीने मागणी केली. वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरणारे, बाळासाहेब संचेती, दिनेश परदेशी, शाबेरभाई खान यांनीही सप्ताहाची मागणी केली.

बेटासाठी 25 लाखांचा निधी देणार- आ. कानडे

उघडीले भांडार धन्याचा तो माल, आम्ही तो हमाल भार वाहे! असे सांंगत श्रीरामपूरचे आमदार लहु कानडे यांनी सराला बेटातील विविध विकास कामे चालू आहेत. या कामांसाठी आपण आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देऊ. आध्यात्मिक विकासाचे सराला बेट हे हृदयस्थळ आहे. नाऊरपर्यंत रस्त्यासाठी 9 कोटी, पुणतांबा ते सराला बेट रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. असे 20 कोटी खर्च करून भाविकांना येता येईल यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. 12 कोटीच्या पुलासाठी प्रा. आमदार बोरणारे व आपण प्रयत्नशील आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या