Friday, May 3, 2024
Homeनगरआजपासून साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात

आजपासून साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही शनिवार दिनांक 24 ते सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत

- Advertisement -

श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणार्‍या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरिता गावकरी/साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परिसरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

श्री. बगाटे म्हणाले, यावर्षी जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून दिनांक 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे दि. 24 ते 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणारा श्रींचा पुण्यतिथी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.

तसेच श्रींचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षा झोळीचा कार्यक्रम होत असतो. त्या अनुषंगाने उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणार्‍या भिक्षा झोळीकरिता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर 4, पिंपळवाडी रोड गेट नंबर 2, चावडीसमोर, नाट्यगृहाशेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तरी गावकरी व साईभक्तांनी भिक्षा झोळीत दान भिक्षा देताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करून भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच संस्थानचे संरक्षण व दान भिक्षा स्विकारणार्‍या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे.

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.15 वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे 5.40 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 या वेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता धुपारती होईल. रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल, परंतु श्री साईसच्चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.

रविवार दिनांक 25 ऑक्टोबर हा श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5 वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 8.30 ते 9 वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी 10 वाजता किर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींचे समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती तर सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी 6 वाजता धुपारती होईल तर रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.

उत्सवाच्या सांगता दिवशी सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, सकाळी 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 6.30 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी 10 वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती होऊन रात्री 10.30 वाजता शेजारती होणार असल्याचे सांगून उत्सव कालावधीतील सर्व विधी मर्यादित संख्येने सामाजिक अंतर पालन करून करण्यात येणार असल्याचेही श्री. बगाटे यांनी सांगितले.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या