Tuesday, January 6, 2026
HomeनगरShirdi : श्री साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला

Shirdi : श्री साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला

लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे-प्रतिदावे!

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीच्या श्रीसाईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी निःस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून सध्या मोठा वाद पेटला आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये या नाण्यांच्या मालकीवरून दावे-प्रतिदावे सुरू असून, यामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या चौकशी अहवालामुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisement -

1918 साली विजयादशमीच्या दिवशी श्रीसाईबाबांनी महासमाधी घेतली. त्यांच्या अखेरच्या काळात श्रीसाईबाबांना नित्यनेमाने भोजन आणि सेवा देणार्‍या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना श्रीसाईबाबांनी निर्वाण समयी चांदीची 9 नाणी भेट दिली होती. ही नाणी श्रीसाईबाबांच्या भक्तीची, विश्वासाची आणि एक ऐतिहासिक, भावनिक ठेव मानली जातात. मात्र, आता याच नाण्यांवरून वाद निर्माण झाला आहे.

YouTube video player

पुरातत्व विभागाकडून सत्यतेची मागणी –
या संपूर्ण वादावर तोडगा काढण्यासाठी आणि खरी नाणी नेमकी कुणाकडे आहेत हे स्पष्ट होण्यासाठी, तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. यामुळे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

श्रीसाईबाबा संस्थानची भूमिका-
यापूर्वी श्रीसाईबाबा संस्थानने या वादात दोन्हीकडील व्यक्तींना नोटीस बजावली होती, ज्यामुळे या वादाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले होते.

साईभक्तांमध्ये संभ्रम-
सध्या शिर्डीत या 9 नाण्यांवरून सुरू असलेल्या वादामुळे देश-विदेशातील करोडो साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. श्रीसाईबाबांनी दिलेली ही ऐतिहासिक नाणी आणि त्यांची सत्यता जगासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.

आमच्याकडेच खरी नाणी, अरुण गायकवाड यांचा दावा
साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दावा केला आहे की, धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात सदर 9 नाणी त्यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टकडे असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीवेळी प्रतिवादी हजर न राहिल्याने अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा दावा योग्य ठरवला आहे. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड (माहेरचे नाव शिंदे) यांचे चिरंजीव आहेत. शैलेजा गायकवाड या लक्ष्मीबाई शिंदे यांच्या मुलगी सोनूबाई यांच्या कन्या आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, 1963 मध्ये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या निधनानंतर ही नाणी त्यांची मुलगी सोनूबाई आणि त्यानंतर शैलेजा गायकवाड यांच्याकडे आली. अरुण गायकवाड यांच्या मते, त्यांच्याकडील नाणीच खरी आहेत आणि साईभक्तांना ती दाखवून ट्रस्ट देणग्या जमा करत असल्याचा आरोप चुकीचा आहे.

गायकवाडांचा दावा खोटा, आम्हीच खरे वारसदार : शिंदे वंशजांचे प्रतिदावे
याउलट, लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी अरुण गायकवाड यांचा दावा खोटा ठरवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीसाईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नाणी त्यांच्या जुन्या घरी असलेल्या मंदिरात आजही आहेत आणि तीच खरी नाणी आहेत. ते स्वतःला लक्ष्मीबाई शिंदेंचे वारसदार मानतात आणि वारसाहक्काने ही नाणी त्यांच्याकडेच असल्याचे सांगतात. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला हजर राहण्याची सूचना किंवा समन्स दिलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 9 नाण्यांची 18 नाणी झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता आणि याच कारणामुळे संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या