मुंबई | Mumbai
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर गुरुवारी रात्री वांद्रे येथील राहत्या घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना घडली होती. या चोराने सैफच्या अंगावर धारदार शस्त्राने सहा वार केले होते. यातील शस्त्राचे वार सैफच्या पाठीत खोलवर घुसले होते. तसेच त्याच्या मानेवर खोल जखम देखील झाली होती. यानंतर सैफला रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता सैफची स्थिती हळूहळू सुधारत असून हल्ला करणारा आरोपी पकडला गेला आहे. शनिवारी मध्यरात्री, मुंबई पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाणे (Thane) येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, “आरोपी ३० वर्षांचा असून तो चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आहे. आरोपीकडे भारतीय कागदपत्रे नाहीत, आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी त्याचे नाव बदलले होते. आरोपी फक्त ५-६ महिन्यांपूर्वीच मुंबईत आलेला होता. आरोपीचे नाव
मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय ३०) असे असून तो घरकाम करत होता. तसेच आरोपीने असेही म्हटले की, त्याला हे माहित नव्हते की हे सैफ अली खानचे घर आहे. आरोपी चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसला होता. आरोपीला जिथे जिथे सुरक्षित मार्ग दिसला तिथे तो तिथे जात होता. अशाप्रकारे तो सैफ अली खानच्या घरी पोहोचला”, असेही पोलिसांनी (Police) म्हटले.
तसेच “प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरीक असावा असा आम्हाला संशय आहे. अटक केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. त्याची उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळाले त्यावरुन आम्हाला तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे. कारण, त्याच्याकडे भारतीय नागरिक (Indian Citizen) असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. भारतात आल्यावर त्याने आपली ओळख बदलली, विजय दास असे त्याने आपले नाव सांगितले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तो मुंबईत आहे. तो हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. सदर आरोपीला ठाणे येथून अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे”, असेही पोलिसांनी सांगितले.
त्या फोन कॉलमुळे सापडलं आरोपीचे लोकेशन
मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सैफवरील हल्लाप्रकरणाचा तपास सुरु असताना आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद याने केलेली एक चूक फायदेशीर ठरली. सैफवर हल्ला केल्यानंतर मोहम्मद दादरला गेला, तिथून त्याने हेडफोन विकत घेतले. त्यानंतर तो मध्य रेल्वेच्या दिशेने जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी या भागातून आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.तपासावेळी आरोपीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठाणे दाखवले. सुरुवातील आरोपीकडे मोबाईल फोन नाही,असे पोलिसांना वाटत होते. कारण त्याचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सापडलेल्या फुटेजमध्ये आरोपी फोनवर बोलताना दिसला. यानंतर पोलिसांनी हल्ल्याच्या वेळी त्या भागात असलेला मोबाईल फोनचा डेटा काढला. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्या भागात जास्त लोक नसल्याने मोहम्मदचा मोबाईल नंबर शोधणे पोलिसांसाठी सोपे झाले. सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर आरोपीचे कुणासोबत तरी फोनवर संभाषण झाले, त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि सकाळी दादर रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर फोन चालू केला आणि कॉल केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन बंद केला, यावेळी त्याचे शेवटचे लोकेशन ठाणे होते. यावरुन पोलिसांना आरोपी ठाण्यात लपून बसल्याचा अंदाज आला.