Saturday, May 2, 2026
HomeनगरNewasa : समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष केशव थोरातांची आत्महत्या

Newasa : समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष केशव थोरातांची आत्महत्या

भ्रष्टाचाराचे खोटे आरोप || मुलाच्या फिर्यादीवरुन खरवंडीच्या 7 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्या प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन 7 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत केशव थोरात यांचा मुलगा अरुण केशव थोरात (वय 33) रा. खरवंडी ता. नेवासा यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, माझ्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन, एक वर्षापासून मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

- Advertisement -

दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेचे सुमारास माझे वडील केशव आनंदा थोरात (वय 63), यांनी घराचे शेजारी असणारे कांद्याचे शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाबत शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजि. नं. 30/2025 प्रमाणे दाखल आहे. माझ्या वडिलांच्या अंत्यविधीनंतर दोन दिवसांनी त्यांच्या फाईल मधील लिहून ठेवलेली कागदपत्रे पाहिली असता त्यांनी आत्महत्या केल्याबाबतचे पत्र मला सापडले.

ते मी आज रोजी पोलीस स्टेशनला समक्ष घेऊन आलो आहे. त्यात माझे वडिलांनी आत्महत्या का केली त्याचा उल्लेख आहे व आत्महत्या करण्यासाठी कोण कारणीभूत आहेत, त्यांची नावे नमूद केलेली आहे. माझे वडील समता शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. सदर संस्थेमध्ये माझ्या वडिलांनी गावातील जबाजी गणपत फाटके, आबासाहेब जबाजी फाटके, भरत संताराम फाटके, जयंत बाबुराव लिपाणे, मच्छिंद्र मुरलीधर शिंदे, बन्सी रामभाऊ म्हस्के, गोरक्षनाथ विश्वनाथ कुर्‍हे (सर्व रा. खरवंडी) या व्यक्तींना सभासद म्हणून घेतले होते. काही वर्षांनंतर गावातीलच जबाजी गणपत फाटके या व्यक्तीने वरील 6 सभासदांना हाताशी धरुन माझ्या वडिलांना बाजुला करुन संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा माझ्या वडिलांनी त्या सभासदांविरुद्ध धर्मादाय आयुक्त, अहिल्यानगर व पुणे येथे तक्रारी दाखल केल्या. त्यावरुन अनेक वेळा त्यांचे आपसात वादविवाद होत होते. त्यानंतर कोर्ट कचेरी मध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून सदरच्या सभासदांनी माझे वडिलांसोबत समझोता घडवून आणण्याचे ठरविले. सदर समझोत्यामध्ये माझ्या वडिलांनी वरील सभासदांविरुद्ध न्यायालयात जे अपील अगर तक्रारी दाखल केल्या होत्या त्या मागे घेण्यात आल्या. त्यास होणारा जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च हा माझ्या वडिलांनी केला, सदर रक्कम आम्ही तुम्हाला नंतर देतो असे ते म्हणाले.

परंतू ती रक्कम सभासदांनी वडिलांना परत दिली नाही. समझोत्यामध्ये ठरल्याप्रमाणे हे सभासद वागले नाहीत व सदर संस्थेमध्ये 26 सभासदांऐवजी 48 सभासद दाखवून खोटे प्रोसिडिंग व अजेंडा बुक तयार करुन 10 लाख रुपये देऊन चेंज रिपोर्ट मंजूर करुन घेतला. तेव्हा समझोत्यामध्ये माझ्या वडिलांचे खर्च झालेले पाच ते सहा लाख रुपये हे वेळोवेळी वडिलांनी मागणी करुनही वरील सहा सभासदांनी परत केले नाहीत.

याउलट माझे वडिलांची आर्थिक फसवणूक करुन शिवीगाळ, दमदाटी केली व माझ्या वडिलांवरच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून त्यांना एक वर्षापासून मानसिक त्रास दिला. तेव्हा त्यांचे त्रासाला कंटाळुन माझ्या वडिलांनी आत्महत्या केली.
या फिर्यादीवरून वरील 7 जणांविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 108 व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भटुअण्णा नामदेव कारखिले करत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...