कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील चांदेकसारे शिवारात समृद्धी महामार्गावर दोन हजार किलो गोमांस घेऊन जाणार्या मोबिल अब्दुल हसन शेख याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैजापूरकडून मुंबईकडे महिंद्रा बोलेरो पिकअप (एम एच 48 बी एम 8973) यामध्ये गोमांस भरून घेवून जात असताना मिळून आला. याबाबत वैभव रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबिल अब्दुल हसन शेख रा. रामू गेनू कांबळे मार्ग कुर्ला मुंबई याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 11, 5 सी 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरासह तालुक्यात वारंवार गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक असेल किंवा गोमांस वाहतूक अशा घटना वारंवार घडत असल्याने गो प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काही वर्षांपूर्वी बैल बाजार रोड येथे महाशिवरात्रीच्या दिवशी गोवंश जनावरांची बेकायदा होत असलेली वाहतूक तसेच गोमांस मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने मोठी कारवाई केली होती. पुन्हा एकदा महाशिवरात्री काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पोलिसांनी 2 हजार किलो गोमांस पकडल्याची कारवाई केली आहे.
राज्य सरकारने गोहत्या बंदी कायदा केलेला असून तसेच गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. मात्र अशा घटना वारंवार होत असल्याने कुठेतरी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. तरी अशा घटना वारंवार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन, पालिका प्रशासन यांनी आता कठोरात कठोर पाऊले उचलणे गरजेचे बनले आहे. गोवंश जनावरांची होत असलेली बेकायदा वाहतूक ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल, गोरक्षक यांनी केली आहे.