Thursday, July 23, 2026
Homeक्राईमKopargaon : समृद्धी महामार्गावर डिझेल तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

Kopargaon : समृद्धी महामार्गावर डिझेल तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

कोपरगावजवळ 56 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon

समृद्धी महामार्गावरून होणार्‍या अवैध इंधन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विविध पेट्रोल पंपांवरून चोरून साठवलेले तब्बल 34 हजार लिटर अवैध डिझेल गडचिरोलीतील सुरजागड खाणींमध्ये विक्रीसाठी नेणारा एक महाकाय टँकर पोलिसांनी थरारक सापळा रचून पकडला. या कारवाईत 55 लाख 87 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महामार्गावरील तस्करीचे मोठे धागेदोरे हाती लागले आहेत.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, टँकर क्रमांक (एमएच 43 बीपी 5085) मधून मोठ्या प्रमाणात अवैध डिझेलची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत कबाडी यांनी तातडीने उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कोपरगाव परिसरात रवाना केले. पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 520 जवळ दबा धरून बसले असताना संशयास्पद टँकर येताना दिसला. पोलिसांनी मोठ्या चातुर्याने टँकर अडवून चालक महादेव वचिष्ट डांगे (रा. नेरूळ, नवी मुंबई) याला ताब्यात घेतले. टँकरची तपासणी केली असता त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रांशिवाय 34 हजार लिटर डिझेल आढळून आले.

चालकाच्या चौकशीतून या रॅकेटचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फरार आरोपी प्रतीक सानप आणि प्रमोद हरणे यांच्या सांगण्यावरून ठाणे जिल्ह्यातील शहापूर-खर्डी रोड आणि स्टेट हायवे 44 वरील विविध पेट्रोल पंपांवरून हे डिझेल गोळा करण्यात आले होते. हे डिझेल गडचिरोलीच्या सुरजागड खाणीत चढ्या दराने विकण्याचा त्यांचा डाव होता. या तस्करीसाठी व्हॉट्सप लोकेशनचा वापर करून अत्यंत गुप्तपणे व्यवहार केला जात होता. कोणतीही सुरक्षा मानके न पाळता आणि ज्वलनशील पदार्थाचा परवाना नसताना अत्यंत धोकादायक पद्धतीने ही वाहतूक सुरू होती. पोलिसांनी 25 लाखांचा टँकर आणि 30 लाख 87 हजारांचे डिझेल असा एकूण 56 लाखांचा माल जप्त केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता पोलीस घेत असून, यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori दिंडोरी- दिंडोरी तालुक्यातील करंजवण लखमापूर वनी दिंडोरी आशावाडी येथे गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह सततच्या मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज...