Wednesday, July 22, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून मृत्यू

वर्धा । Wardha

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. वर्धा जिल्हा हद्दीत उभ्या असलेल्या एका इथेनॉलच्या ट्रकला पुण्याकडून येणाऱ्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दुर्दैवी अग्नितांडवात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धा हद्दीतील महामार्गावर इथेनॉल वाहून नेणाऱ्या एका ट्रकचा आधी किरकोळ अपघात झाला होता, ज्यामुळे तो रस्त्यावरच उभा होता. या परिस्थितीमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून यंत्रणेकडून महामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्याची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान, पुण्याकडून वर्ध्याच्या दिशेने येणाऱ्या एका कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही कार थेट उभ्या असलेल्या इथेनॉलच्या ट्रकला जाऊन धडकली. इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने धडक बसताच एका क्षणात दोन्ही वाहनांना भीषण आगीने वेढले.

या दुर्घटनेचे स्वरूप अत्यंत थरकाप उडवणारे होते. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, ट्रकमध्ये असणाऱ्या चालक आणि क्लिनर यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा आगीत अडकून जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, पेटलेल्या ट्रकच्या खाली कार अडकल्यामुळे कारमधील चार प्रवाशांचाही आतमध्येच गुदमरून व जळून दुर्दैवी अंत झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे लोळ लांबूनही स्पष्ट दिसत होते.

या हृदयद्रावक घटनेतील मृत व्यक्तींमध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड गावच्या रहिवाशांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अधिकच मन हेलावून टाकणारी आहे. कारमधील मृतांमध्ये दोन सख्ख्या जुळ्या बहिणींचा समावेश होता. या दोन्ही भगिनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या होत्या. आपल्या उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून गावी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातला आणि त्यांचे स्वप्न कायमचे अपुरे राहिले.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अपघात इतका भयंकर होता की, कारचा चेंदामेंदा झाला होता. अखेर पोलिसांनी आधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : आषाढ सरींचे तांडव सुरू; भंडारदरा ‘एवढे’ टक्के भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण...