नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनच्या कथित वापरात जखमी झालेल्या एका तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर राहुल गांधी यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह पीडित तरुण साहिल आणि त्याचे आई-वडीलही सहभागी झाले होते.
कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान जंतरमंतर परिसरात पॅलेट गनचा वापर करण्यात करण्यात आला होता. या घटनेदरम्यान कनॉट पॅलेस परिसरात उपस्थित असलेल्या साहिलच्या शरीरात पॅलेट गनचे काही छर्रे घुसले होते. त्यापैकी एक छर्रा हृदयाजवळ लागल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करून संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.
या मागणीसाठी राहुल गांधी आज दुपारपासूनच संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसले होते. सुरुवातीला पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, राहुल गांधी आपल्या मागणीवर ठाम राहिले. पीडित साहिल आणि त्याचे आई-वडीलही त्यांच्यासोबत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसले होते. नंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही आंदोलनस्थळी येऊन सहभाग नोंदविला.
अनेक तासांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, “ही तर फक्त सुरुवात आहे. न्यायाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे,” असे म्हटले.
राहुल गांधी यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “एका तरुणावर अन्याय झाला आहे. तो सकाळी साडेअकरा वाजता येथे आला होता आणि आता सायंकाळचे पावणेसात वाजले आहेत. एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला जवळपास आठ तास प्रतीक्षा करावी लागली.”
दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत एका नागरिकाची तक्रार दाखल करण्यासाठी एवढा वेळ लागत असेल, तर छोट्या शहरांतील आणि गावांतील पोलीस ठाण्यांमध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळविताना किती अडचणी येत असतील, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
“आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. आम्ही केवळ एका नागरिकासाठी आणि त्याच्या आई-वडिलांसाठी न्यायाची मागणी केली,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पोलिसांना एफआयआर नोंदवायची होती; मात्र त्यांना वरून रोखण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्याबाबत राहुल गांधी यांनी गंभीर आरोप करत, अंतिम मंजुरी केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घ्यावी लागली, असा दावा केला. “एफआयआर कोण रोखत होते, हे यावरून स्पष्ट होते. पोलीस अधिकारी तक्रार नोंदवू इच्छित होते; मात्र त्यांना वरून थांबवण्यात येत होते,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, महिन्याभरानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या अनेक तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी तक्रार स्वीकारल्याने काँग्रेसने याला पीडिताला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यातील पहिले यश मानले आहे.
या प्रकरणातील एफआयआरनंतर पुढील तपासात पॅलेट गनचा वापर नेमका कोणी आणि कोणत्या परिस्थितीत केला, साहिलच्या जखमांबाबतची वैद्यकीय स्थिती काय आहे तसेच या घटनेसाठी जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




