Thursday, October 1, 2026
Homeनगरसमृद्धी महामार्गावर आता स्मार्ट नजर; अतिवेगाला ऑनलाइन दंडाचा लगाम

समृद्धी महामार्गावर आता स्मार्ट नजर; अतिवेगाला ऑनलाइन दंडाचा लगाम

7 स्मार्ट नियंत्रण कक्षांतून 700 किमी महामार्गावर 24 तास नजर || अपघातस्थळी रुग्णवाहिका, क्रेन, फायर ब्रिगेडची तातडीने मदत

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh

प्रवाशांची सुरक्षा, अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहनांच्या अतिवेगाला आळा घालणे तसेच महामार्गावरील लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थापन सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 700 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर एक अशा सात स्मार्ट नियंत्रण यंत्रणांनी सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या असून या नियंत्रण कक्षांतून संपूर्ण महामार्गावरील वाहतुकीवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील शिर्डी इंटरचेंजचाही समावेश आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अतिवेगामुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रवाशांना लुटण्याच्या घटनाही घडल्याने महामार्गावरील प्रवासाबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. महामार्गावर प्रत्येक चार किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक लेनवर सहा कॅमेर्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हाय-रिझोल्यूशन कॅमेरे, सेन्सर आणि नियंत्रण कक्ष यांच्या समन्वयातून महामार्गावरील वाहनांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या संपूर्ण यंत्रणेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एनसीसी या खासगी कंपनीकडे सोपविली आहे.

या यंत्रणेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करता येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्यात येत असून निर्धारित वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनांची नोंद या यंत्रणेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित वाहनावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई होणार असल्याने वाहन चालकांना वेगमर्यादेचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे. समृद्धी महामार्गावर अवजड मालवाहू वाहन बंद पडल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी मागून येणार्‍या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होतो. एखादे वाहन एकाच ठिकाणी काही काळ थांबल्याचे कॅमेर्‍यांच्या माध्यमातून निदर्शनास आल्यास नियंत्रण कक्षातून त्याची माहिती घेऊन घटनास्थळी गस्त वाहन तातडीने पाठविण्यात येणार आहे. अपघात झाल्यास नियंत्रण कक्षाला त्याची माहिती तात्काळ मिळणार असून रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, क्रेन, रोड पेट्रोलिंग वाहन तसेच अन्य आवश्यक मदत कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ वाचवून जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.

शिर्डीजवळील कोकमठाण इंटरचेंजसह संपूर्ण समृद्धी महामार्गावर सात स्मार्ट नियंत्रण इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील यंत्रणेचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू आहे. पुढील सहा महिन्यात ही अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या यंत्रणेमुळे नियमित प्रवासी, व्यावसायिक, भाविक तसेच इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला मोठा हातभार लागणार असून समृद्धी महामार्गावरील अतिवेगाला आळा बसण्याबरोबरच अपघाताच्या वेळी मदत यंत्रणा अधिक वेगाने घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...