अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतन वाढीच्या कराराकडे दुर्लक्ष करणार्यांविरोधात सांगलीच्या वसंत दादा साखर कारखान्यांच्या स्थळावर राज्यातील साखर कामगारांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार (दि. 14) होणार्या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
राज्यातील साखर कारखाना कामगार व जोडधंद्यातील कामगारांच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर नवीन समिती गठित करण्यासाठी शासनाकडे सहा महिने पाठपुरावा करूनही काहीच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे राज्य सरकार व साखरसंघाचे लक्ष वेधण्यासाठी 7 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयावर राज्यातील साखर कामगारांनी इशारा मोर्चा काढला होता. हा मोर्चा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन राज्यव्यापी फेडरेशनच्या वतीने काढण्यात आला होता.
या मोर्चामध्ये राज्यातील 50 हजार साखर व जोडधंद्यातील कामगार सामील झाले होते. तसेच महासंघ व प्रतिनिधी मंडळ यांनी राज्यपातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, साखर संघाचे अध्यक्ष, साखर व कामगार आयुक्त यांच्याकडे गेली सहा महिने वेळोवेळी मागण्यांचा पाठपुरावा करून देखील शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे राज्यातील साखर कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यामुळे राज्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांना संलग्न असलेल्या युनियन्स मधील कारखान्यांतील साखर व जोडधंद्यातील कामगारांचा मेळावा सोमवारी सांगलीच्या वसंत दादा साखर कारखान्यांच्या स्थळावर आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये साखर कामगारांच्या वेतन मंडळाच्या कराराबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महासंघ व प्रतिनिधी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व युनियनचे प्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, अध्यक्ष कॉ. पी. के. मुंडे, सरचिटणीस कॉ. सुभाष काकुस्ते, कार्याध्यक्ष शिवाजीराव औटी, उपाध्यक्ष शरद नेहे, विलास वैद्य, भाऊसाहेब बांदल, यु. एन. लोखंडे, सत्यवान शिखरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव कौठवळ, सहचिटणीस रामदास रहाणे, नंदु गवळी, आनंदा भसे, रावसाहेब वाकचौरे तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, डी. एम. निमसे, अशोक पवार, ज्ञानदेव पाटील आहेर यांनी आहे.