संगमनेर | महेश पगारे
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये नेहमीच केंद्रस्थानी असणाऱ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघावर सलग आठ वेळा निर्विवाद वर्चस्व राखणारे काँग्रेसचे राज्याचे दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध महायुती कोणाला मैदानात उतरविणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीत थोरातांनी शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा तब्बल ६२ हजार २५२ मतांनी पराभव केला होता. आता या निवडणुकीत थोरातांचे पारंपरिक विरोधक असलेल्या विखे कुटुंबातील डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी महायुती नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब संगमनेरमधून थोरातांच्या विरोधात शिवसेनेकडून साहेबराव नवले निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते. यामध्ये नवलेंना ६३ हजार १२८ मते मिळाली होती. तर थोरातांना १ लाख २५ हजार ३८० मते मिळाली होती. तब्बल ६२ हजार २५२ मतांनी नवलेंचा त्यांनी पराभव केला होता.
तीन दशकांहून अधिक काळ थोरातांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आत्तापर्यंत मजबूत राहिला आहे. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबतची आपली इच्छाही माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संगमनेरमधील दौरेही वाढले. अद्यापही महायुतीने उमेदवाराबाबत स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे पेच कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहिला आहे. यामध्ये थोरातांची भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यातच संगमनेर हा मतदारसंघ नेहमीच एकहाती ठेवण्यात थोरातांना यश मिळालेले आहे. येथील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संस्थांवरही त्यांचे कायमच वर्चस्व राहिलेले आहे. याशिवाय राज्यात महाविकास आघाडीचा नवीन प्रयोग करण्यात आला होता.
तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. त्यात थोरातांची भूमिका मोठी होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी देण्याचं काम केल्याचा आठवण समर्थक सातत्याने करून देतात. ते निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरणार आहेत. त्यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विधानसभा निवडणूक थोरातांना एकहाती ठरणार की विखे मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मैदानात उतरून चुरस वाढवणार, याची उत्सुकता वाढली आहे.