
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील मोगलपुरा परिसरातील एका कॉस्मेटिक दुकानावर औषध प्रशासन विभाग आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानात उत्पादित करण्यात आलेल्या प्रतिबंधित सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला. याप्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या क्रीमचे नमुने रासायनिक परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत.
याप्रकरणी शाहिद रियाज शेख (वय 36, रा. रेहमतनगर, गल्ली क्रमांक 3, जोर्वे रस्ता, संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार राहुल पांडे यांनी फिर्याद दिली आहे. औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांच्या पथकाने संबंधित कॉस्मेटिक दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान पोलिसांना ‘गोरी ब्युटी क्रीम्स – मेड इन पाकिस्तान’ असे नमूद असलेल्या तसेच निळ्या अक्षरात ‘पाकिस्तान स्टँडर्ड’ असा उल्लेख असलेल्या क्रीमचा साठा आढळून आला. याशिवाय ‘गोरी डे अँड नाईट ब्युटी क्रीम – मेड इन पाकिस्तान’ असा उल्लेख असलेल्या आणि लाल अक्षरात ‘पाकिस्तान स्टँडर्ड’ छापलेल्या क्रीम्सही जप्त करण्यात आल्या.
कारवाईत पाकिस्तानात निर्मित 12 हजार 100 रुपये किमतीची प्रतिबंधित सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या क्रीमचे नमुने पुढील तपासासाठी रासायनिक विश्लेषणाकरिता औषध निरीक्षक मुळे यांनी ताब्यात घेतले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही उत्पादने संगमनेरमध्ये कशा मार्गाने आणण्यात आली, त्यांचा पुरवठादार कोण आहे आणि आणखी कुठे त्यांची विक्री होत होती, याचाही पोलीस आणि औषध प्रशासन विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.




