अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नाजूक प्रकरणातून कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथील तरूणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय 32) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. गणेशचा मृतदेह मंगळवारी (20 ऑक्टोबर) दुपारी वांबोरीजवळील कुक्कडओढा (ता. राहुरी) गावाच्या शिवारात आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केले.
मयत गणेश यांचा भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय 34, हल्ली रा. विहा मांडवा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, मुळ रा. कमालपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश राजेंद्र जाधव आणि महेश राजेंद्र जाधव (दोघे रा. शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ गणेश याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. तो पुणे येथे नोकरी करून राहत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते.
दारू प्यायल्यानंतर तो कुटुंबीयांशी वाद घालत असे. गणेश याचे एका महिलेसोबत लग्नापूर्वी संबंध होते. 17 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून प्रदीप यांना फोन आला. गणेश दारू पिऊन शिंगवे नाईक येथील एका घरात शिरत असताना आढळल्याचे आणि त्याला पकडून ठेवल्याचे फोन करणार्याने सांगितले.
दरम्यान, प्रदीप यांनी शिंगवे नाईक गावातील नागरिकांकडे चौकशी केली असता, गणेश घरात शिरताना आढळल्याने योगेश जाधव व महेश जाधव यांनी त्याला मारहाण करून ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात टाकल्याची माहिती मिळाल्याचे प्रदीप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.




