संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील जनतानगर परिसरात गांजाची विक्री करणार्या टोळीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 4.13 किलो गांजासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य असा 2 लाख 34 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक संगमनेर शहर परिसरात माहिती संकलन करत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत जनतानगर येथील नम्रता किराणा दुकानासमोर राहणारा संजय ऊर्फ संदीप राजू मालुंजकर हा आपल्या साथीदारांसह घरात गांजाच्या पुड्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, सोमनाथ झांबरे व शिवप्रसाद काकडे आणि शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे, पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान, श्रीकांत सावंत, पोलीस अंमलदार आत्माराम पवार, बाबासाहेब सातपुते, राहुल पांडे व संदीप कोंदे यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात संजय ऊर्फ संदीप राजू मालुंजकर (वय 26), आकाश विजय क्षीरसागर (वय 29, हल्ली रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) आणि प्रवीण सखाराम पाचकर (वय 28, हल्ली रा. जनतानगर, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या घराची तसेच घरासमोरील दुचाकीची झडती घेतली असता घरात आणि दुचाकीच्या डिक्कीत 4.130 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत 1 लाख 3 हजार 250 रुपयांचा गांजा, 80 हजार रुपयांची दुचाकी, 50 हजार रुपयांचा मोबाईल तसेच गांजाच्या पुड्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या प्लास्टिक पिशव्या, चिकट टेप, स्टेपलर व पिना असा एकूण 2 लाख 34 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यागुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.




