संगमनेर (तालुका प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र बापू गडगे याच्या आश्रमातून दोनशेहून अधिक व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले असून पोलीस कोठडीत अस-लेला भोंदू गडगे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, राहाता या ठिकाणी १३ मालमत्ता असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ९० पेक्षा अधिक औषधे सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे, या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलीस घेत आहे.
कॅन्सरसारखे दुर्धर आज ार मंत्राने, दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो, घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो, असे सांगून अनेकांची अंधश्रद्धेद्वारे फसवणूक करत गडगे हा त्यांच्याकडून इन पैसे उकळायाचा. त्याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगाव पान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅड. रंजना पगार गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. गडगे आणि मधुकर शिंदे हे दोघे अटकेत आहेत.
अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे म्हणाले, आश्रमातून हस्तगत केलेले सर्व व्हिडिओ फॉरेन्सिक टीमकडून ऑडिट करून घेणार आहोत. गडगे याची ट्रस्ट नोंदणीकृत असून त्यावर सात ट्रस्टी आहेत. विविध बँकांमध्ये दहा ठिकाणी गडगे याची खाती असून त्यावर झालेल्या आर्थिक व्यवहाराचे संदर्भाने देखील पोलीस अधिक तपास करत आहेत. गडगे याच्या उपचाराने बरे वाटत आहे, असे सांगणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
उपचाराने बरे वाटते, असे सांगणारे लोक हे खरोखर रुग्ण आहेत का? अथवा त्यांचे गडगे याच्याशी काय संबंध आहेत?, याचाही तपास पोलीस करणार आहे. त्यातूनही अधिक माहिती समोर येईल. गडगे महाराज याच्या भोंदूगिरी प्रकरणात डॉ. मोहन पुरी हा आरोपींपैकी एक आहे. तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. डॉ. पुरी हा औषध पुरवठ्याचा सूत्रधार आहे. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. असेही अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. त्यामुळे अटकेत असलेल्या भोंदू राजेंद्र गडगे याचा पाय आणखीन खोलात अडकणार असल्याचे पाहावयास मिळत आहे.




