Wednesday, December 4, 2024
Homeनगरसंगमनेरात बापलेकीला दुचाकीस्वाराकडून मारहाण

संगमनेरात बापलेकीला दुचाकीस्वाराकडून मारहाण

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको || दोन गुन्हे दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहराजवळील निंबाळे चौफुली येथे चारचाकी वाहनातून जाणार्‍या बापलेकीला एका दुचाकीस्वार तरुणाने कट मारला. त्याचा जाब विचारल्यावर तरुणाने दोघांनाही शिवीगाळ करत चापटीने मारहाण करून पळून गेला. यामुळे संतप्त नागरिकांसह संघटनांनी पुणे-नाशिक बाह्यवळण मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. संगमनेर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून दोन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की रविवारी (दि.10) सकाळी 10 वाजेच्या सुमारास विश्वनाथ सुकदेव शिंदे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (क्र. एमएच.17, एए.885) मुलीला बसस्थानक येथे सोडण्यास जात असताना निंबाळे चौफुली येथे मोटारसायकलवरील अयान असीफ बेग याने बेदरकारपणे व भरधाव वेगाने गाडी चालवून कट मारला होता.

- Advertisement -

त्यास कट का मारला असे विचारले असता त्याने दोघांनाही शिवीगाळ करत चापटीने मारहाण करून पळून गेला. यामुळे संतप्त झालेल्या निंबाळे ग्रामस्थांसह संघटनांनी पुणे-नाशिक बाह्यवळण मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको केला. यामुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. याप्रकरणी विश्वनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम आणि मोटार वाहन कायद्यानुसार अयान बेग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर अयान बेग यानेही दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत निंबाळे चौफुलीसह शहरात शांतता आहे. कुणीही कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नये. कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा सदर घटनेबाबत कोणीही अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या