Sunday, July 26, 2026
HomeनगरSangamner : संगमनेरच्या महामार्गावरील ‘ते’ मृत्यूचे सापळे हटणार कधी?

Sangamner : संगमनेरच्या महामार्गावरील ‘ते’ मृत्यूचे सापळे हटणार कधी?

वादळी वार्‍यामुळे धोकादायक होर्डिंग कोसळण्याची भीती

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग आणि संगमनेर शहरातून जाणारा जुना नाशिक-पुणे महामार्ग या सर्वच प्रमुख रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून त्यात वादळी वार्‍यामुळे देखील हे होर्डिंग कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे एखादा मोठा अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांत महामार्गांच्या कडेला प्रचंड मोठे लोखंडी सांगाडे उभे करून जाहिरातींचे फलक लावण्याचे पेव फुटले आहे. अनेक ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या अगदी कडेला हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. तर वारे देखील सुटत आहे. अशा परिस्थितीत हे जड लोखंडी सांगाडे वार्‍याचा वेग सहन करू न शकल्यास थेट रस्त्यावर किंवा जाणार्‍या-येणार्‍या वाहनांवर कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबई, पुणे, नाशिक येथील झालेल्या भीषण होर्डिंग दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर राज्यभरातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संगमनेर परिसरातील परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजूनही गाढ झोपेत आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, महामार्गावरून रोज हजारो वाहने आणि पादचारी ये-जा करत असतात. वादळात जर एखादे होर्डिंग कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली, तर स्थानिक ग्रामपंचायत की एजन्सी यापैकी कोण जबाबदारी घेणार? असा जाहीर प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशीचे नाटक करण्यापेक्षा, दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे. सर्व प्रमुख मार्गावरील होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) करण्यात यावे. नियमबाह्य आणि अनधिकृतपणे उभारलेले होर्डिंग्स तातडीने निष्कासित (काढून) करण्यात यावेत. वादळी वार्‍यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक फलकांचे फ्लेक्स तातडीने उतरवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : ईव्ही डीलरशिपच्या नावे लूट; बनावट वेबसाईट तयार...

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) व्यावसायिक विस्ताराचा गैरफायदा घेत सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) एक हायटेक जाळे पसरवल्याचे समोर आले आहे. नामांकित...