संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
पाच दिवसांपूर्वी संगमनेर शहरात पोलिसांनी एमडी अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणास पकडले होते. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता दोघांना अटक केली आहे. तर आणखी चौघे पसार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांनी दिली. शुक्रवारी पोलिसांनी 103 ग्रॅम वजनाच्या एमडी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी थांबलेला तरुण आशिष सुनीलदत्त मेहेरे यास अलिशान वाहनासह पकडले होते.
या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 9 हजार रुपयांचा एमडी अंमली पदार्थ आणि 40 लाख रुपयांचे अलिशान वाहन असा एकूण 43 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करत असताना पोलिसांनी शहरातील सोहेलशेर महमंद शेख (वय 45) व सद्दाम अब्दुल शेख (वय 35) या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अजून चौघे पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांनी दिली.




