Thursday, May 2, 2024
Homeनगरसंगमनेर शहरात गुन्हेगारीत लक्षणीय वाढ

संगमनेर शहरात गुन्हेगारीत लक्षणीय वाढ

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहर व परिसरात या वर्षात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंठणचोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरी यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

शहरात तब्बल 60 मोटार वाहनांची चोरी झाली असून 18 घरफोड्या झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला मात्र अपयश आले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरत्या वर्षात मोटारसायकलच्या चोर्‍या वाढल्याचे दिसून येत आहे. मोटारसायकली व इतर वाहनांच्या जवळपास 60 चोर्‍या झाल्या आहेत. अनेक नागरिकांनी पाठपुरावा करुनही त्यांची वाहने मात्र सापडू शकली नाही. पोलिसांच्या डीबी शाखेने या तपासात फारशी प्रगती केल्याचे दिसत नाही.

मोटारसायकल चोर्‍यांसोबतच छोट्या मोठ्या घरफोड्याही वाढल्याचे दिसत आहे. शहरात तब्बल 18 घरफोड्या झाल्या आहेत. यातील आरोपींना पकडणेही पोलिसांना जमले नाही. धूमस्टाईल गंठण चोरीही वाढली आहे. शहर व परिसरात तीन गंठण चोर्‍या झाल्या आहे. अनेक चोर्‍यांचे पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले नाहीत. अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारुनही त्यांचे दागिने परत मिळालेले नाही.

संगमनेर शहर हद्दीतून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करण्यात आली. वाळू तस्करांनी वाळूची खुलेआम वाहतूक केलेली असतानाही गुन्हे मात्र अतिशय कमी दाखल झाले आहेत. यावर्षी वाळू चोरीचे अवघे 19 गुन्हे दाखल झाले आहेत.

काही पोलीस व वाळू तस्कर यांच्यातील हितसंबंधामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावल्याचे दिसले. मारामारीच्याही तब्बल 21 घटना घडल्या. यामध्ये 32 जणांना किरकोळ दुखापती झाल्या. शहरात सरत्या वर्षात बलात्काराच्या पाच घटना घडल्या आहेत. तर विनयभंगाच्या तब्बल 23 घटना घडल्याचे पोलीस नोंदीवरून दिसत आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पोलीस अधिकार्‍यांच्या होणार्‍या बदल्या. पोलिसांवर अधिकार्‍यांचा वचक नसणे याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात झाला आहे. वर्षाच्या अखेरीस पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या रुपाने खमके अधिकारी शहराला मिळाला होता.

त्यांनी पदभार स्विकारताच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणली होती. मात्र पोलिसांची लाचखोरी त्यांना भोवली. त्यांची अचानक बदली झाली. काही दिवस गुन्हेगारी नियंत्रणात आली असतांना देशमुख यांची बदली झाल्याने शहरातील अवैध व्यवसायीकांनी आपले व्यवसाय सुरु केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या