Thursday, May 2, 2024
Homeनगरसंगमनेरात गणेश विसर्जनासाठी 16 संकलन केंद्रे

संगमनेरात गणेश विसर्जनासाठी 16 संकलन केंद्रे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या गणेश मुर्तीचे विसर्जन व निर्माल्य संकलनासाठी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या

- Advertisement -

मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन व नगरपालिकेच्या विद्यमाने 16 संकलन केंद्रे व 5 कृत्रिम तलावांची निर्मिती करून पुढाकार घेतला असून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अमृत रथाचे लोकार्पण करण्यात आले.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालय येथे अमृत रथाचे लोकार्पण झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती नितीन अभंग, किशोर टोकसे, सुनंदाताई दिघे, बाळासाहेब पवार, श्रीनिवास पगडाल, मिलींद औटी, एकविरा फाउंडेशनच्या प्रा. वृषाली साबळे, डॉ. शिल्पा गुंजाळ, डॉ. सुरभी आसोपा, सुरभी मोरे, ऐश्वर्या वाकचौरे, डॉ. अहिल्या ओहोळ, ज्योती थोरात, प्रा. एम. वाय. दिघे, सुभाष सांगळे, अनिल थोरात, निखील पापडेजा, अभिजीत बेंद्रे आदी उपस्थित होते.

संगमनेर नगरपालिका व एकविरा फाउंडेशनने गणेश विसर्जनासाठी व निर्माल्य संकलनासाठी चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, रंगार गल्ली, चव्हाणपुरा, कॅप्टन लक्ष्मी चौक, स्वातंत्र्य चौक, राजस्थान थिएटर जवळ, मेनरोड, अकोले रोड, बी. ए. कॉलेज समोर, गणेशनगर, जनतानगर, इंदिरानगर, जयहिंद सर्कल मालदाड रोड, शिवाजी नगर, एस. टी. स्टॅन्ड जवळ व नगर रोड, भूमि अभिलेख कार्यालयाजवळ अशी 16 संकलन केंद्रे उभारली आहेत. तर जाणता राजा मैदान, रणजित स्पोर्ट क्लब, भारत चौक, नेहरू गार्डन जलकुंभ, पोफळे मळा येथे 5 कृत्रिम तलाव उभारले आहेत.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, नगरपालिका व एकविरा फाउंंडेशनने गणेश विसर्जनासाठी एकत्रित सुरू केलेले काम हे कौतुकास्पद आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील युवतींची एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगले काम सुरू केले आहे.

मागील वर्षी ही त्यांनी गणेश विसर्जन काळात निर्माल्य जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली होती. गणेश उत्सव हा आनंदाचा काळ आहे.परंतु करोनामुळे या आनंदावर विरजन आले आहे. गणेश चरणी प्रार्थना आहे की, करोना संकट लवकर टळू दे. व नागरिकांना पुन्हा मोकळेपणाने आनंदाने राहता येऊ दे असेही ते यावेळी म्हणाले.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या, करोना संकटात नगरपरिषदेने नागरिकांची जास्तीत जास्त काळजी घेतली आहे. गणेश उत्सवात अनेकांनी एकत्र येणे टाळले हे करोना साखळी तोडण्यासाठी चांगले होते.

आता विसर्जनात ही सोशल डिस्टन्सचे पालन करावे. स्वच्छतेत व नियम पाळून श्रीगणेशाचे विसर्जन व्हावे म्हणून नगरपालिका, प्रशासन कटिबध्द आहे. नागरिकांनी 16 संकलन केंद्रावर आपल्या गणेश मूर्ती व निर्माल्य जमा करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी अमृत रथाद्वारे शहरात स्वच्छतेविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

एकविरा फाउंडेशनकडून विसर्जनास मदत

डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनाच्या दिवशी नगरपालिका व पोलीस कर्मचारी यांनी मास्क, सॅनेटायझर, हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्वच क्वारंटाईन सेंटर मधील व्यक्तींना 1 वेळ गोड जेवणही देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या