मुंबई । Mumbai
मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासह ५ खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट आणि संघर्षाचा इशारा देणारा कलगीतुरा रंगला आहे. ठाकरे गटाने बंडखोर खासदारांविरोधात राज्यभर ‘ऑपरेशन तुडवा’ जाहीर केले आहे. मात्र, या ‘ऑपरेशन’ला आता बंडखोर खासदारांनीही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नागेश आष्टीकर आणि संजय जाधव यांच्यानंतर आता थेट खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटाला अत्यंत टोकाचा आणि आक्रमक इशारा दिला आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटावर थेट आणि वैयक्तिक हल्ला चढवला. “माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितले, तर एक तर तुम्ही स्मशानात जाल किंवा थेट हॉस्पिटलमध्ये! त्यामुळे माझ्या वाटेला येण्यापूर्वी आधी स्वतःचा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा,” अशा शब्दांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उघड आव्हान दिले.
त्यापुढील पाऊल टाकत त्यांनी शासनाकडे आपली सुरक्षा हटवण्याची मागणी केली आहे. “मला पोलीस संरक्षण नको आहे. कारण माझ्यासोबत पोलीस असतील तर समोरच्यांना मारताना पोलीस मला अडवतील. पोलीस सोबत नसताना त्यांनी माझ्यावर हल्ला करायला यावे, म्हणजे मीही त्यांना दाखवून देईन. मला त्यांची अजिबात भीती नाही, उलट त्यांनाच माझी भीती आहे,” असा छातीठोक दावा त्यांनी केला.
ठाकरे गटातील अंतर्गत वादावर आणि मुंबईतील स्थानिक नेत्यांवर असंतोष व्यक्त करताना संजय दिना पाटील यांनी अनेक जुने हिशोब जाहीर केले. “मी शिवसेना सोडणार अशी जेव्हा चर्चा होती, तेव्हा एका नेत्याने माझ्या घराबाहेर येऊन शिव्या दिल्या होत्या. माझ्या मुलीला महापालिका निवडणुकीत आम्ही तिकीट मागायला गेलो नव्हतो. मनसेला ती जागा जाऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःहून माझ्या मुलीला तिकीट दिले होते. माझी मुलगी मतदारसंघात तिचे काम स्वतःच्या हिमतीवर करत होती,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघात केला.
काही दिवसांपूर्वी जेव्हा शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांना ‘अज्ञातस्थळी’ हलवल्याची चर्चा रंगली होती, तेव्हा संजय दिना पाटील थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचले होते, जिथे ठाकरे कुटुंबही उपस्थित होते. मात्र, या पडद्यामागील घडामोडींनंतर आता थेट उघड बंड करत पाटील यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी काळात मुंबईच्या राजकारणात मोठे वादळ आणणार याचे स्पष्ट संकेत देत आहे. ठाकरे गटाच्या ‘ऑपरेशन तुडवा’ला आता शिंदे गटाकडून ‘क्रियेला प्रतिक्रिया’ मिळणार, हे आता निश्चित झाले आहे.




