मुंबई । Mumbai
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे दोघेही पूर्णपणे अपयशी ठरले असून, “देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल” असल्याची खोचक टीका त्यांनी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपच्या धोरणांवर आणि नेत्यांच्या विधानांवर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग करत असून त्यांचे वर्तन नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. “कायदा माझे काय वाकडं करणार?” अशा अविर्भावात पंतप्रधान वागत असल्याचा आरोप राऊतांनी केला. तसेच, पंतप्रधानांना खोटे बोलण्याचा जणू एक ‘राष्ट्रीय आजार’ जडला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मोदींच्या विधानांना आता देश गांभीर्याने घेत नाही, असेही ते म्हणाले.
देशाचे नेतृत्व केवळ काँग्रेसच करू शकते, हे मोदींच्या वर्तनातून वेळोवेळी सिद्ध होत असल्याचे राऊत यांनी नमूद केले. भाजपला ५४३ जागा मिळाल्या तरी त्यांच्यातील ‘थोर पुरुषांच्या’ जागाच केवळ राखीव होतील, असा टोला त्यांनी लगावला. मोदींना नेहमीच देश कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून पेटता ठेवायचा असतो. मग तो विषय ‘लव्ह जिहाद’चा असो किंवा लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा असो. पुलवामा दुर्घटनेतील शहीद जवानांच्या पत्नींचा आक्रोश त्यांना दिसला नाही, आता त्यांनी हे ‘ढोंग’ बंद करावे, कारण जग त्यांच्यावर हसत आहे, असा घणाघात राऊतांनी केला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या जुन्या ट्वीटचा संदर्भ देत ते म्हणाले की, भाजपने महिला विधेयकाची भ्रूणहत्या नाही, तर चक्क ‘गो-हत्या’ केली आहे. २०२३ मध्ये विधेयक मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या फसवणुकीबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला हवी. दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय करून भाजप ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ या नीतीने वागत आहे, ज्याला आमचा ठाम विरोध आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, सध्या देशात सर्व सूत्रे हिंदूंच्या हाती असताना ‘हिंदू खतरे मे’ अशा घोषणा कशा दिल्या जातात? जर खरोखरच कोणी संकटात असेल, तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरांवरील नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देवेंद्र फडणवीस हे मोदींचे केवळ चेले असून महाराष्ट्रात ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.
बॉलिवूडमधील मुस्लीम कलाकारांवर होणाऱ्या टीकेचाही राऊतांनी समाचार घेतला. दिलीप कुमार, मीना कुमारी, मधुबाला यांसारख्या कलाकारांनी भारतीय सिनेसृष्टी समृद्ध केली आहे. शाहरुख आणि सलमान खान यांच्यावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, भाजप नेत्यांच्या घरच्या कार्यक्रमांना हेच कलाकार हजेरी लावतात. नारायण राणे यांच्या वाढदिवसाला किती ‘खान’ आले होते, याचा त्यांनी विचार करावा. मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींनी बोलताना भान राखले पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला. भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी खान मंडळींची ‘खानावळ’ चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.




