Saturday, May 2, 2026
HomeराजकीयSanjay Raut : …म्हणून अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली जात नाही; संजय...

Sanjay Raut : …म्हणून अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली जात नाही; संजय राऊतांचे खळबळजनक आरोप

मुंबई । Mumbai

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज, २८ फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांच्या अपघाती निधनाभोवती असलेल्या संशयाचे जाळे अधिकच गडद होताना दिसत आहे.

- Advertisement -

अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनी आणि ‘डीजीसीए’ (DGCA) वर गंभीर आरोप करत या मृत्यूला जबाबदार धरले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी ‘व्हीएसआर’ कंपनी ही मुख्य आरोपी असून ‘डीजीसीए’ ही सहआरोपी आहे. या दोन्ही संस्थांच्या गुन्हेगारी हातमिळवणीमुळेच अजित पवारांचा बळी गेल्याचा दावा त्यांनी केला. “या प्रकरणाची सखोल चौकशी का टाळली जात आहे?” असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकी हक्कावर बोट ठेवले. या कंपनीत आंध्र प्रदेशातील काही राजकारणी, महाराष्ट्रातील काही बडे नेते आणि अत्यंत प्रभावशाली उद्योगपती बेनामी भागीदार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

राऊत यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (DGCA) कडक शब्दांत ताशेरे ओढले. “डीजीसीए ही देशातील सर्वात भ्रष्ट संस्था आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील ३०० बळी असोत किंवा अलीकडची एअर अ‍ॅम्ब्युलन्स दुर्घटना, हे सर्व डीजीसीएच्या हलगर्जीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे फळ आहे. आता अजित पवारांचा बळीही त्याच भ्रष्ट कारभारामुळे गेला आहे,” असे गंभीर विधान राऊत यांनी केले.

राजकीय संघर्षावर भाष्य करताना राऊत यांनी दावा केला की, अजित पवार ज्या कारणासाठी भाजपसोबत गेले होते, ते काम पूर्ण न झाल्याने ते प्रचंड अस्वस्थ होते. “जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय संपेल या आशेने ते सत्तेत सहभागी झाले, पण ती फाईल बंद झाली नाही. उलट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश दिले होते. ज्या क्लोजर रिपोर्टसाठी त्यांनी एवढी मोठी राजकीय जोखीम पत्करली, तोच रिपोर्ट मिळत नसल्याने अजित पवार पुन्हा स्वगृही परतण्याच्या विचारात होते,” असे राऊत यांनी नमूद केले.

दुसरीकडे, अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे देखील या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच शंका उपस्थित करत आहेत. याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. यावरून विरोधक आता अधिकच आक्रमक झाले असून, सत्तेत सहभागी असलेल्या नेत्यांना वाचवण्यासाठीच चौकशीत दिरंगाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट अण्णा हजारे यांचा विरोध डावलून आता सादर करण्यात आला असला, तरी अजित पवारांच्या निधनाचे गूढ मात्र अद्याप कायम आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...