मुंबई | Mumbai
“पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाचने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठे करण्याची राक्षसी भूक लागली आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपावर केली आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आरोपांवर संशय व्यक्त केला आहे.
शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची सुरुवातच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवत केली आणि त्यांच्यात एका वक्तव्यावरून त्यांची फिरकीसुद्धा घेतली.
भोपाळ येथील मेळाव्यात मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हंटले आहे की, अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आम्ही केला नव्हता. भाजपाच्या भोपाळ येथील मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अजित पवार मंत्रिमंडळात सामील झाले. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे.
अजित पवारांचा वेगळा मार्गाने जाण्याचा इरादा
अजित पवारांनी महापालिकेनिमित्त भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा वेगळ्या मार्गाने जाण्याचा इरादा दिसत आहे. भाजपा खा खा खातोय आणि त्यांना खाणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांनी इतर पक्षातील खाणाऱ्या लोकांना बरोबर घेतले आहे. भाजपा पक्ष लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने मालमत्ता गोळा करत असेल आणि सत्तेतील उपमुख्यमंत्री अशाप्रकारचा आरोप करत असतील तर याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
त्यांनी शरद पवारांबरोबर परत आले पाहिजे
“अजित पवार भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर ते सरकारमध्ये का राहिले आहेत? त्यांनी शरद पवारांबरोबर परत आले पाहिजे, असेही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची युती झालेलीच आहे. अमित शाहांनी त्यांच्या हातात दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ त्यांचा नाही, तो शरद पवारांचा आहे. हे त्यांनाही माहीत नाही”, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.
अजित पवारांनी काय आरोप केला
भय ना भ्रष्टाचार, म्हणत ९ वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या सत्ताधारी भाजपाने आशिया खंडातील श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जाच्या खाईत लोटली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे वाटोळे करणाऱ्या लुटारू टोळीचा आणि भ्रष्टाचारी राक्षसाचा माज उतरुन, त्या राक्षसाचे दहन या निवडणुकीत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार शहरवासीयांना केले. भाजपाच्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा त्यांनी वाचला. स्वत:च्या परिवाराला मोठे करणारी ही राक्षसी भूक आता बघवत नाही. माझा जीव तुटतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.




