Monday, July 27, 2026
HomeराजकीयSanjay Raut : 'त्या' मंत्र्यांनाही सहआरोपी करा; भोंदू अशोक खरात प्रकरणात संजय...

Sanjay Raut : ‘त्या’ मंत्र्यांनाही सहआरोपी करा; भोंदू अशोक खरात प्रकरणात संजय राऊत यांची मागणी

मुंबई । Mumbai

भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. जादूटोणा, तंत्र-मंत्र आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली खरातला अटक झाल्यानंतर त्याचे संबंध थेट मंत्रालयातील बड्या नेत्यांपर्यंत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली असून, खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या मंत्र्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे पुरोगामी, सुधारणावादी आणि विज्ञानवादी राज्य आहे. अशा थोर वारसा लाभलेल्या राज्यात जर भोंदूगिरी आणि बुवाबाजीला राजाश्रय मिळत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे राऊत म्हणाले. “जे सत्ताधारी अशा बुवाबाजीला खतपाणी घालतात, त्यांना या गुन्ह्यापासून वेगळे ठेवता येणार नाही. या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांची चौकशी करून त्यांना सहआरोपी केले पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

अशोक खरात याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल बोलताना राऊत यांनी धक्कादायक माहिती समोर आणली. खरातवर पहिला गुन्हा २००३ मध्येच दाखल झाला होता, त्यानंतर २००५ मध्येही त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली होती. एवढेच नव्हे तर, एका वृत्तपत्राने त्याच्या काळ्या कारनाम्यांवर सविस्तर लेखमाला प्रसिद्ध केली होती, ज्यासाठी संबंधित पत्रकाराला धमक्याही देण्यात आल्या होत्या. “खरातचे वास्तव माहित नव्हते, हा सत्ताधाऱ्यांचा दावा धादांत खोटा आहे. सगळी पार्श्वभूमी माहित असतानाही जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याच्या पाया पडत असतील आणि तंत्र-मंत्राचा आधार घेत असतील, तर ते कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत,” असे राऊत यांनी निक्षून सांगितले.

नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपासाला गती दिली आहे. या तपासात अनेक बड्या धेंडांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “माझा नाशिकच्या पोलीस आयुक्तांवर पूर्ण विश्वास आहे. या चौकशीतून समोर येणारी नावे दडपली जाणार नाहीत, अशी अपेक्षा आहे,” असे राऊत म्हणाले. याचवेळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. “केसरकर यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका,” असे म्हणत त्यांनी सरकारची पाठराखण करणाऱ्या मंत्र्यांवर टीका केली.

अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेले मंत्रालयातील फोटो आणि माहितीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, हे सखोल तपासाअंती स्पष्ट होईलच, मात्र संजय राऊत यांच्या या मागणीमुळे आता सरकारवर दबाव वाढला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरी नष्ट करायची असेल, तर मुळापासून कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...