नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस हा इंडिया आघाडीतील बिग ब्रदर आहे. प्रत्येक बाबतीत काँग्रेसने पुढाकार घेणे गरजेचे आहे. बिग ब्रदरचे काम हे समन्वयाचे आहे. फक्त जागावाटपात मोठा वाटा मागण्याचे काम बिग ब्रदरचे नाही, असा चिमटा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला काढला आहे. बटेंगे तो कटेंगे हा संदेश नरेंद्र मोदींनी फक्त देशाला नव्हे तर इंडिया आघाडीलाही दिला. लोकसभेला इंडिया आघाडी सर्व राज्यांमध्ये एकत्र लढली पण विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र इंडिया आघाडीचे गणित जमले नाही, त्याचा फटका बसला. म्हणजे राज्य भाजपच्या हातात द्यायची का ? असा सवाल विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आघाडीतील बिघाडीवरून कानपिचक्या दिल्या. ते दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, “अशा पद्धतीने राज्य हे आम्ही भाजपच्या हातात द्यायची, तर भविष्यातील लोकसभा निवडणूक कशी लढणार? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचा चांगला निकाल लागला. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया’ आघाडीच्या सातत्याने बैठका, चर्चा होत होत्या. महाराष्ट्राच्या निवडणूक यंत्रणेत घोटाळे झाले आहेत. दिल्लीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते झाले आहेत. ‘आप’ला जिथे यश मिळतेय, त्या मतदारसंघात हजारो मतदारांची नावे गाळण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघातून ३१ हजार जणांची नावे वगळण्यात आली,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
“पंतप्रधान मोदींनी किंवा भाजपला मते मिळाली म्हणजे, ते सर्वेसर्वा आहेत, असे होत नाही. विरोधी पक्षाचे कर्तव्य विधानसभा, लोकसभेसह रस्त्यावर उतरणे सुद्धा आहे. इंडिया आघाडी फक्त संसदेत दिसते. संसदेच्या बाहेर येणे सुद्धा गरजेचे आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूख अब्दुल्ला असे मोठे नेते ‘इंडिया’ आघाडीत आहेत. इंडिया आघाडीने मजबूत राहिले पाहिजे. इंडिया किंवा महाविकास आघाडी ही फक्त निवडणूक लढण्यासाठीच आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीत जय-पराजय होतो. पण, ‘इंडिया’ आघाडीने निवडणुकीव्यतिरिक्त अनेक प्रश्नांवर एकत्र येणे गरजेचे आहे, असे जनतेच्या भावना आहेत.
काँग्रेसला टोला
हे आपण उत्तर प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रात लोकसभेला पाहिले आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतील काँग्रेसच्या नेतृत्वाने पुढाकार घेणे आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत. लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की फक्त जागावाटपामध्ये बिग ब्रदर नको. बिग ब्रदरचे काम हे समन्वयाचे आहे, फक्त जागावाटपामध्ये मोठा वाटा मिळवण्यात नाही,अशा शब्दांत संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा