मुंबई | Mumbai
गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच, सोमवारी (9 जून) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो.” असे स्टेटस ठेवले. “अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही,” असे सूचक विधान केले. याबाबत महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, धर्मांध, जातीय आणि महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत अजित पवार गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोणत्या मोठ्या क्रांतिकारी विचारांनी गेलेले नाहीत. भाजपाचा विचार हा शहीद भगत सिंग, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही. लुटा, खा आणि वाटा, हाच त्यांचा विचार आहे. सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
“सुप्रिया सुळे यांचे म्हणणे बरोबर आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सध्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ईडी, सीबीआय किंवा पोलीस यंत्रणेच्या हातात असतात. निवडणूक आयोगाचा वापर करत तुम्ही पक्ष फोडला आहे. मला असे वाटत नाही की शरद पवारांचा पक्ष हा भाजपसारख्या धर्मांध, महाराष्ट्र द्रोही पक्षासोबत जातील. सुप्रिया सुळेंना मी ओळखतो. त्यामुळे त्या अशा पक्षासोबत जातील असे मला वाटत नाही. शरद पवारांची विचारधारा जी आहे, ती फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार तसेच यशवंतराव चव्हाणांची विचारधारा आहे. हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये 60 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ” असे म्हणत संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही. त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा