नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ठाकरे गटाचे शिवसेनेच्या गळाला लागलेले ६ खासदार येत्या २ दिवसांत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ९ पैकी तब्बल ६ खासदार फुटल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. तर ६ खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात, फुटलेल्या खासदारांची अधिकृत भूमिका समोर आलेली नसली, तरी त्याबाबत शिवसेना उबाठा पक्षाकडून जोरदार हालचाली होऊ लागल्या आहे. त्यातच आता या ६ खासदारांमध्ये नेमके मंत्रीपद कुणी घ्याययचे? यावरून वाद सुरू झालेला असून रात्रीच्या सुमारास त्यावर तोडगा काढण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एकाला मंत्रीपद तर इतरांना प्रत्येकी वाढीव २५
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तर फुटीर खासदारांवरही जोरदार टीका केली. तर धक्कादायक दावा करताना म्हटले की, ‘फुटीर खासदारांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल. इतरांना प्रत्येकी वाढीव २५ कोटी रुपये मिळतील. त्यांची रात्री ही डील झाली आहे. फुटीर खासदार बिळात लपून बसले आहेत. महाराष्ट्राचे गृहखाते गद्दारांना संरक्षण देत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. गुन्हेगारी वाढली आहे. अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. संपूर्ण पोलीस दल गद्दारांच्या रक्षणासाठी लावलं आहे’.
Rajabhau Waje: कोट्यावधी रुपयांच्या ऑफर्सला नाकारलं; खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशकात जंगी स्वागत
त्यांच्याकडून तुम्ही बंडाची वा विचारांची काय अपेक्षा ठेवणार? त्यांच्या मतदारसंघात लोक प्रेतयात्रा काढतायत. हे बिळात लपून बसले आहेत. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावले आहेत. तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, मग तुम्हाला पोलीस ताफा कशासाठी हवाय?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
लाज असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे
‘गद्दारांनी हिंमतीवरून फिरून दाखवावे. तुम्ही ५० कोटी रुपये घेतले. तु्म्ही हिंमतीवर २०० कोटींची ठेके घेतले. त्याच हिंमतीवर रस्त्यावर मोकळेपणाने फिरून दाखवावे. लाज असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा. आम्ही पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, थोडीतरी लाज असेल, तर राजीनामे द्या. त्यानंतर उघडपणे निवडणुकीला सामोरे जा.
महाराष्ट्रात भाजपचे ७ तुकडे होतील
गद्दारीचे समर्थन भाजपचे लोक करत आहेत. अर्धा तास ईडी सीबीय मिळू दे. महाराष्ट्रात भाजपचे ७ तुकडे होतील. सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांनी आई-बापाच्या, साईबाबांच्या आणि आई भवानीच्या खोट्या शपथा घेतल्या, त्यांनी राजीनामे द्यावेत आणि उघडपणे जनतेला सामोरं जावं”, असं थेट आव्हान राऊतांनी ६ बंडखोर खासदारांना केलं.




