
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील वडुले शिवारात उसाच्या शेतामध्ये गांजाची शेती उघडकीस आली असून नेवासा पोलिसांनी एक वाळलेले व 30 जिवंत झाडे अशी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीची सुमारे पावणेदोन क्विंटल (170 किलो306 ग्रॅम) वजनाची 31 झाडे जप्त केली असून संबंधीत शेतकर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील वडुले शिवारातील बबन शंकर देशमुख (वय 67) यांच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड करून त्याची सुकवून छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची व तिथे 40 ते 50 झाडे असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्यामार्फत मिळाली. पोलिसांनी सोमवार दि. 31 रोजी वडुले शिवारातील उसाच्या शेतात छापा टाकून 170 किलो 306 ग्रॅम वजनाची मुळासकट 31 झाडे तसेच जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल पंचांसमक्ष नोंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या झाडांमध्ये एक वाळलेले झाड व 30 जिवंत झाडांचा समावेश असून एकूण 170 किलो 306 ग्रॅम वजनाचा हा मुद्देमाल आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत 8 लाख 51 हजार 530 रुपये इतकी आहे.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल नारायण एकनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेतमालक बबन शंकर देशमुख यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 चे कलम 8(ब), 8(क), 20(अ) व 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त अहिल्यानगर अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह पोलीस हवालदार भानाजी काळोखे, बाबासाहेब वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, वाल्मिक वाघ, संतोष खंडागळे, आप्पासाहेब वैद्य, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीता पवार सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षकांचे आवाहन
ड्रग्स अथवा अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत नागरिकांना कोणतीही गोपनीय माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने डायल 112 किंवा नेवासे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणार्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.




