मुंबई । Mumbai
मुंबई : केंद्र सरकारने महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती हे तीन विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात आणले होते. मात्र तीन दिवस चर्चेनंतरही महिला आरक्षण विधेयक संमत झाले नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (21 एप्रिल) वरळीत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरून विरोधक भाजपवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे.
महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवण्याच्या अटीवरून राऊतांनी भाजपला चांगलेच घेरले. “लोकसभेच्या ८५० जागा झाल्याशिवाय आरक्षण लागू करणार नाही, ही कुठली अट? हा विषय संविधानात कधी आला?” असा सवाल करत त्यांनी पुढे म्हटले, “हा ८५० चा आकडा खरात बाबांनी दिला आहे का? ते मोठे आकडेतज्ज्ञ आहेत, म्हणूनच भाजप या आकड्याला चिकटून बसली असावी. प्रत्यक्षात ५४३ जागांमध्येच आरक्षण देणे अधिक सोयीचे आणि संतुलित आहे.” तसेच “आरक्षण तुमच्या हातात आहे, अंमलबजावणी करा, अडवलंय कोणी? तुम्हाला ट्रम्पला विचारायचं आहे की पुतिनला?” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजकारणात सहसा विरोधी पक्ष मागण्यांसाठी मोर्चे काढतात. मात्र, केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपने मोर्चा काढल्याबद्दल राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “महिला आरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाविरोधात मोर्चा काढणं, हे जगातलं पहिलं आश्चर्य असावं. या अजब विक्रमाबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा जांबोरी मैदानावर सत्कारच करायला हवा.” भाजपच्या जन आक्रोश मोर्चाच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत यांनी दावा केला की, “महिलांच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त दिसत होते. जनतेने त्यांची ‘ठासली’ आहे. ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळणे बंद होतील, त्या दिवशी खरी नारी शक्ती कोणाकडे आहे, हे भाजपला कळून येईल.” २०२३ मध्ये महिला आरक्षण कायदा मंजूर झाला असून १६ एप्रिल रोजी त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. तरीही भाजपकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. “देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तुमचे आहेत. महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री आहेत. कोणत्याही विरोधी पक्षाने या आरक्षणाला विरोध केलेला नाही. मग अंमलबजावणी करण्यासाठी भाजपला मुहूर्त कोणाचा हवा आहे? अडकाव तर केवळ भाजपचाच आहे,” असा थेट आरोपही त्यांनी केला.





