मुंबई | Mumbai
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून महायुतीला २८८ पैकी तब्बल २३५ जागा मिळाल्या आहेत. मात्र महायुतीने अद्याप सत्तास्थापन केलेली नाही. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न देखील सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काल मुंबईत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार होती. मात्र या बैठकीआधीच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. निकालाबाबत लोकांच्या मनात संशय आहे. आता किती दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या दिवशी आपल्या गावाला निघून गेले. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, पण ते कधी होणार? याची महाराष्ट्र वाट बघत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की आणखी कोणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाणून घेण्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. मुख्यमंत्रीपदाची घोषणा कधी होणार? फडणवीसांचे नाव समोर येणार की आणखी कोणाच्या नावाची घोषणा होणार? असे प्रश्न लोकांना पडले आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जगभरातून संशय व्यक्त केला जात आहे.
या राज्याच्या निकालाबाबत जगातल्या अनेक भागात संशय व्यक्त केला जात आहे. ७६ लाख मते कशी वाढली? नाना पटोले यांचा जो प्रश्न आहे तो आमचा पण प्रश्न आहे. रात्री साडे ११ पर्यंत कोण मतदान करत होते? हाच फॉर्मयुला हरियाणामध्ये वापरला आहे. हरियाणात १४ लाख मते वाढली. ७६ लाख मते अचानक वाढली ही मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार आहेत. लाडकी बहीण वगैरे काही नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे काल अचानक आपल्या गावी निघून गेले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले नाही. त्यांचा चेहरा पडलेला आहे. डोळ्यात चमक दिसत नाही. ते स्वतः म्हणताय मी सगळ्यांचा लाडका भाऊ आहे. वेगळा निर्णय ते घेणार नाहीत, त्याला हिंमत लागते, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.