Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउज्जवल निकमांचं टोरेंट पॉवर प्रकल्पाला समर्थन; संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले १०...

उज्जवल निकमांचं टोरेंट पॉवर प्रकल्पाला समर्थन; संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले १० झाडं म्हणजे…

मुंबई | Mumbai
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कर्जत येथील सायडोंगर आणि पाली खलाटी परिसरातील जंगलात टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी केला आहे. असे असताना स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प असल्याचं मत जेष्ठ विधिज्ञ शेष सरकारी वकील आणि भाजपचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. तसेच कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प वस्तुस्थिती देखील उज्जवल निकम यांनी मांडली आहे. तर उज्ज्वल निकम यांनी कर्जत येथे होत असलेल्या वृक्षतोडीचं समर्थन केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार, संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

एका खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढली
आम्हाला उज्जवल निकम यांच्याबद्दल आदर आहे. ते आमचे मित्र आहेत. पण त्यांनी एका खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढली आहेत. १० झाड म्हणजे एक कसाब आहे. आम्ही झाडं आणि कसाब यांना एकात तागडीत तोलतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

आई फक्त भाजपलाच आहे का?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ३३,००० झाडं या पहिल्या टप्प्यात ते तोडणार आहेत. 33,000 झाडं तोडणं म्हणजे संपूर्ण जंगल नष्ट करणं. तिथून भीमाशंकर वाईल्ड लाईफ हे 20 किलोमीटरवरती आहे. त्यानंतर हे जे जंगल आहे साई जंगल, या जंगलामध्ये आदिवासी राहतात. जल, जमीन, जंगल ही आदिवासींची प्रॉपर्टी आहे. नरेंद्र मोदी म्हणतात, एक पेड माँ के नाम. कोणाची माँ? एक पेड माँ के नाम, मग त्या कातकऱ्यांनीच लावलेली झाडं आहेत ना ती, त्यांना आई नाही का? आई फक्त भाजपलाच आहे का? की आदाणीला आहे? की टोरंट कंपनीच्या मालकाला आई आहे? की माझा आईचं झाड आहे मी कापतो.

अख्ख जंगल त्या कंपनीच्या मेहतांच्या ताब्यात दिले आहे
तर, तिथल्या स्थानिकांनी सांगितले की, त्या डोंगरामध्ये अनेक वनऔषधी आहेत आणि वनऔषधी कशा तर विष उतरवणाऱ्या. साप चावला, विंचू चावला तर तेव्हा ते विष उतरवण्यासाठी लोक देवळात येतात आणि मग ते लोक वर्षानुवर्षे ज्याची परंपरा आहे, ती औषध घेऊन विष उतरवतात आणि माणसांचे जीव वाचवतात, अशी माहिती सुद्धा राऊतांनी दिली. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या टोरंट कंपनीला परवानगी दिली आहे. अख्ख जंगल त्या कंपनीच्या मेहतांच्या ताब्यात दिले आहे. महाराष्ट्रातील जंगल नष्ट करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्री पर्वताच्या रांगा नष्ट करायच्या आणि हे मेहता, शहा यांना ते द्यायचे. शेतकऱ्यांनी विरोध केला तर बंदुका रोखायच्या. रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने पोलीस ग्रामस्थांना मारण्यासाठी उपस्थित आहेत. कडेकोट बंदोबस्त आहे, असेही राऊतांनी सांगितल.

IND vs NZ : भारताला मालिका विजयाची संधी; ईशान किशन दुखापतीमुळे बाहेर

हे राक्षसी सरकार आहे
टोरंट कंपनीने स्पष्टीकरण दिलंय की, 60 वर्षांसाठीचा हा प्रकल्प असणार आहे, वन्यजीव संवर्धन वगैरे केलं जाणार आहे, यावर संजय राऊत म्हणाले की, कसं काय करणार? 200 वर्षाची, 300 वर्षाची झाडं तोडायची आणि मग कुठेतरी रोपती लावायची. कुठे लावणार? जागा आहे कुठे? आरेमध्ये 3000 झाडं तोडली. तिकडल्या वन्यजीवांचं काय झालं? कुणी जाऊन पाहिलं का? रात्रीच्या काळोखात झाडं तोडली, आरेतली. आणि त्या झाडावरची घरटी, पक्षी, प्राणी रात्रभर आक्रोश करत होते. त्यांची अंडी, त्यांची पिल्लं छोटी छोटी छोटी रात्रभर तडफडत होती. हे राक्षसी सरकार आहे. आतासुद्धा काल आम्ही जे ऐकलं, की जेव्हा ही झाडं तोडत होते, तेव्हा हजारो पोपट, मोर, इतर प्राणी आणि पक्षी तिथे तडफडत होती, त्यांची घरं तुटली, त्यांची घरटी गेली, त्यांचा निवारा गेला. ते रात्रभर पुढे काही दिवस तिथे तडफडत, फडफडत होते. लाजा वाटत नाही का या सरकारला? देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला किंवा मोदी आणि त्यांच्या सरकारला लाज वाटत नाही? मुळात त्यांनी त्यांच्या खात्यातलं जे पर्यावरण मंत्रालय रद्द करावं, केंद्रानं आणि महाराष्ट्राने, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

पाण्याच्या साठ्यांमुळे भविष्यात तिथे भूकंपाची शक्यता वर्तवली आहे
तर, टोरंट प्रकल्प, महाराष्ट्रात उद्योग यायला हवेत. महाराष्ट्र हे औद्योगिक फ्रेंडली राज्य आहे. यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून या महाराष्ट्रात उद्योग येत आहेत. हे आम्हाला मोदी आणि फडणवीसांकडून शिकण्याची गरज नाही. ब्रिटीशांच्या काळात सुद्धा इथे उद्योग होते. या मुंबईत 325 गिरण्या होत्या. हा एक औद्योगिक पट्टा होता. हे काही मोदी किंवा फडणवीसांनी आणलेले उद्योग नव्हते. त्यांनी उद्योग बाहेर पळवले. तेव्हा उद्योग आणले याची शेकी त्यांनी मिरवू नये. या ज्या एमआयडीसी स्थापन झालेल्या आहेत, त्या यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी यांच्या काळात स्थापन झालेल्या आहेत. औद्योगिक प्रकल्प आम्ही आणलेले आहेत. त्यांनी काय केलेले आहे? त्यांना कोणाचा तरी काळा पैसा या ठिकाणी गुंतवायचा आहे. तो मुख्यतः गुजरातमधून येत आहे. बाकी काही नाही. हजारो लोक विरोध करत आहेत. पाण्याच्या साठ्यांमुळे भविष्यात तिथे भूकंपाची शक्यता वर्तवली आहे.

ताज्या बातम्या