बीड | Beed
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती लोटला आहे. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा निघाला. या मोर्चात सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. बीडकरांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने आज हा दिवस आमच्या परिवाराला पाहावा लागत आहे, अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी आपण एकत्रित येऊ आणि त्याची दक्षता घेऊ, असे आवाहन केले आहे.
काय म्हणाली वैभवी देशमुख?
‘आत्ताच मला माझ्या चाचाने सांगितले, माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच झाला होता. आनंद हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या पणजीने त्यांचा नाव इथल्या संतोषी माते वरून संतोष असे ठेवले होते. म्हणून मी याच ठिकाणावर तुम्हा सर्वांना एक विनंती करते, माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांची हत्या कशाप्रकारे झाली. त्यांचा याच्यामध्ये काही गुन्हा नसताना ते समाजसेवक असताना, समाजासाठी त्यांनी कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एका दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग घडला. ही वेळ आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाला ही वेळ आली आहे, दुसऱ्या कोणावर ही वेळ येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे वैभवी देशमुख यावेळी बोलताना म्हणाली आहे.
वैभवीने पुढे म्हटले की, ‘जसे काल आभाळ आले होते, सूर्य झाकला होता. आज ऊन पडले आहे, आज सूर्य चांगला प्रकारे दिसतो. पण, माती आड गेलेले माझे वडील मला कधी दिसणार नाही आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ म्हणून जाता कामा नये. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहा आणि माझ्या कुटुंबासोबत राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून घेऊ, हा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊन लढू. हा अन्याय होतो आहे हा अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून आपण लढू. आपण मिळून पुढे जाऊ माझ्या वडिलांना आणि आपल्याला सर्वांना न्याय मिळवून घेऊ असेही तिने म्हटले.
सर्व पक्षीय मोर्चा निघाला
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व पक्षीय महामोर्चा निघाला. यात दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब, मनोज जरंगे पाटील, संभाजी राजे छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस , राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया, विनोद पाटील, यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.