बीड | Beed
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओमधून पळून जातानाचे सीसीटीव्ही समोर आले आहे. त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ लावून सहा आरोपी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपीत कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे. या व्हिडीओनंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नव वळण मिळाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातल्या पारा चौकात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत आरोपी पोहोचतात. याच ठिकाणी गाडी लावून आरोपींनी पलायन केले असून यात सहा आरोपी पळून जाताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे. वाशी परिसरात असणाऱ्या साखर कारखान्याच्या दिशेने हे सहा आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी चार किलोमीटरचे अंतर पाई चालले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. या घटनेचा ९ डिसेंबर २०२४ चा संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे.
या सीसीटीव्हीच्या आधारे तपास यंत्रणा तपास करत असून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत पोहोचता येईल का? हा प्रश्न मात्र कायम आहे. तर घटनेनंतर तपास यंत्रणेने ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती सीआयडीकडून घेतली. त्यानंतर ते म्हणाले, मोबाईलचा डाटा रिकव्हर झाला आहे. तो डाटा सीआडीकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईल बाबत तपास सुरु आहे. तो डाटासुद्धा रिकव्हर झाला आहे. तसेच सर्व आरोपींवर खुनाचे गुन्हे आणि मकोका लावण्यात आले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक झाली आहे. आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.
शस्र परवाने रद्द
दरम्यान, बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत ३१० शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवान्यांचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यामध्ये, पहिल्या टप्प्यात १००, दुसऱ्या टप्प्यात ६०, तिसऱ्या टप्यात २३ तर चौथ्या टप्प्यात १२७ परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना रद्दचा आकडा ५०० वर जाण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा