मुंबई | Mumbai
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने मुंडे गोत्यात आले आहेत. तसेच विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी बीड येथील भगवानगडावर जाऊन तेथील महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती.
त्यानंतर शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे म्हटले होते. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात नाहक लक्ष्य करण्यात येत असून हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले होते. यावरून महंत नामदेव शास्त्री यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) आणि मुलीने नामदेव शास्त्रींची भेट घेतली. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्रींकडे काही पुरावे दिले.
तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील खरे कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यापुढे मांडला. यावेळी आरोपींच्या गुन्ह्याचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न देखील धनंजय देशमुख यांनी केला. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी लगेच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, यावेळी नामदेव शास्त्री म्हणाले की,”देशमुख कुटुंब हे भगवान बाबाला (Bhagwan Baba) मानणारे आहे. जातीय सलोखा या गावात असून यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवले. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत. धनंजय यांचे म्हणणे आहे की, याला जातीयवादाचे स्वरुप देऊ नका, भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते देशमुख कुटुंबीयांनी दाखवले. त्यामुळे भगवान गड तुमच्या पाठीशी कायम राहील ही ग्वाही देतो. तसेच खऱ्या आरोपीला (Accused) शिक्षा व्हावी हे माझे भगवानगडाच्या गादीवरून सांगणे आहे”, असेही महाराजांनी म्हटले.