बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
दरम्यान, आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असणारा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी केज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले होते.
त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आले होते. याठिकाणी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडची 14 दिवसाची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज कराड याला दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले जाईल. गेले चौदा दिवस झाले कराड याला बीड येथील शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.
न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून वाल्मिक कराड केज न्यायालयाच्या दिशेने रवाना झाला. वाल्मिक कराड याला तब्बल 13 दिवसांनी पोलीस कोठडीतून बाहेर आणण्यात आले. त्यावेळी वाल्मिक कराड याचा लूक बदललेला दिसला. 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्याने वाल्मिक कराडची दाढी वाढलेली आहे. त्याच्या डोक्यावरचे केसही बरेच विस्कटलेले दिसत होते. एरवी टापटीप राहणाऱ्या वाल्मिक कराडचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.