नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे एकाच रात्री सराफ दुकान, कापड दुकान तसेच इतर अशा एकूण पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून दागिने, कपडे व वस्तू असा एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली.
याबाबत पंकज प्रताप कपिले (वय 35) रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे शिरसगाव गावात मारुती मंदिरासमोर कपिले ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. माझ्या दुकानासमोरच सतीश दत्तात्रय पोटे यांचे श्रीदत्त क्लॉथ स्टोअर्स नावाचे कापड दुकान तसेच दत्तात्रय एकनाथ पोटे यांचे सचिन ट्रेडर्स नावाचे दुकान असून गावातच बाजारतळावर बँक ऑफ बडोदाची मिनी शाखा आहे.
19 जानेवारी रोजी सायंकाळी सराफ दुकान बंद करून सलबतपूर येथे गेलो. त्यानंतर दुसर्या दिवशी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मी घरी झोपलेलो असताना मला शिरसगाव येथील सचिन ज्ञानेश्वर देशमुख यांनी फोन करून तुमच्या दुकानात चोर घुसले आहे असे सांगितले. मी, वडील प्रताप कपिले, भाऊ विनायक रमेश कपिले, चुलते संजय गणपत कपिले असे मोटार सायकलवर शिरसगाव येथे आलो. आम्ही येण्यापूर्वी चोर तेथून पळून गेलेले होते व तेथे गावातील लोकांची गर्दी झालेली होती. आम्ही दुकानात जावून खात्री केली असता दुकानातील डागडुजीसाठी आलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर हे आम्हाला दिसले नाही. तेव्हा चोरी झाल्याची खात्री झाली.
35 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुंबर, 18 हजार रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने. त्यात चांदीच्या अंगठ्या, कडे, ब्रेसलेट त्याचबरोबर 10 हजार रुपये किमतीचा हिक व्हिजन कंपनीचा डीव्हीआर असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमांनी आमच्या दुकानात प्रवेश करुन चोरून नेला. तसेच आमच्या गावातील सतीश दत्तात्रय पोटे यांच्या कापड दुकानातून 24 हजार रुपये रोख रक्कम व 10 हजार रुपये किमतीचे कपडे त्यात अंडरवेअर, बनियान, साड्या यांची चोरी झाली.
तर दत्तात्रय एकनाथ पोटे यांच्या सचिन ट्रेडर्स या दुकानाचे शटर तोडले असल्याबाबत तसेच बँक ऑफ बडोदा, मिनी शाखा शिरसगाव येथील 8 हजार रुपयांची चोरी झाल्याचे तसेच सुधाकर दादा हारदे, रा. माळेवाडी दुमाला, ता. नेवासा यांच्या घरीही चोरी झाल्याचे मला समजले आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत.