Friday, May 3, 2024
Homeनगरआदिवासी सारिकाची शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी

आदिवासी सारिकाची शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील साकेगाव केंद्राअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे या शाळेतील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले असुन यापैकी आदिवासी समाजातील सारिका आजिनाथ थोरात हिची केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय दुर्बल घटक योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. शिष्यवृत्ती मिळवणारी जिल्हा परिषद शाळेतील पाथर्डी तालुक्यातील ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.

- Advertisement -

सारिका थोरात हिला यापुढील काळात प्रती महिना एक हजार रुपये प्रमाणे चार वर्षात आठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा तहसील कार्यालयात गौरव करण्यात आला.

कु. सारिका आजिनाथ थोरात हीने अनुसूचित जमाती मधुन अहमदनगर जिल्ह्यातील निवड झालेल्या एकूण 38 विद्यार्थांमध्ये तिने 19 वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील एकूण सहा विद्यार्थांमध्ये तिने पाचवा क्रमांक मिळविला आहे. तिला आता या शिष्यवृत्तीच्या पैशातुन बारावी पर्यंत शिक्षण यशस्वीपणे पुर्ण करता येणार आहे. तिला शिष्यवृत्ती परिक्षेसाठी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शामवाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, डायटचे अधिव्याख्याता रामेश्वर लोटके, विस्तार अधिकारी भवार, अभय वाव्हळ, केंद्रप्रमुख बागडे, अमोल नलवडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांकडून सारिकाचे अभिनंदन होत आहे.

प्रतिकुल परिस्थितीत यश

आदिवासी भागात राहणार्‍या सारिका हिचे कुटुंब आदिवासी असुन आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आहे. सुट्टीच्या दिवशी ती स्वतः दुसर्‍याच्या शेतात कापुस वेचणीसाठी जाऊन कुटूंबाला आर्थीक हातभार लावते. तिच्या कुटुंबाकडे राहाण्यासाठी स्वतःचे घर सुद्धा नाही. गावापासून दूर माळरानावर सरकारी जमीनीमध्ये छप्पर बनवून तिचे कुटुंब राहत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत तीने हे यश मिळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या