Tuesday, June 16, 2026
Homeनगर‘सार्वमत सुवर्णमहोत्सवा’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी

‘सार्वमत सुवर्णमहोत्सवा’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी

महोत्सव, परिसंवाद, विशेषांकांसह विविध उपक्रमांचे आयोजन

श्रीरामपूर/अहिल्यानगर |प्रतिनिधी

वाचकप्रिय वाटचालीचे अर्धशतक गाठणार्‍या दैनिक ‘सार्वमत’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून लोकप्रिय अभिनेते, लेखक, टीव्ही प्रेझेंटर मिलिंद गुणाजी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित परिसंवाद, विशेषांक प्रकाशन, स्पर्धांसह विविध उपक्रमांपैकी निवडक समारंभात उपस्थित राहून ते प्रत्यक्ष वाचकांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीतील सर्वार्थाने स्थानिक आणि वाचकप्रिय दैनिक ‘सार्वमत’ 26 जानेवारी 2025 रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाले. श्रीरामपूरसारख्या तालुक्याच्या शहरातून एका प्रादेशिक वर्तमानपत्र समूहाने दैनिकाची मुहूर्तमेढ रोवण्याचे धाडस देशदूत-सार्वमत वृत्तसमूहाचे संस्थापक स्व. देवकिसनजी सारडा यांनी दाखविले. त्यांचा हा निर्णय दूरदृष्टीचा आणि काळाचा वेध घेणारा ठरला, हे सार्वमतच्या यशस्वी वाटचालीने सिद्ध केले. म्हणून पाच दशकांचा हा प्रवास सार्वमत आणि ग्रामीण पत्रकारितेसाठी मोठा टप्पा ठरतो.

सोपी भाषा, सहज संवाद आणि कोणाचीही भीड न बाळगता प्रश्नांची थेट उकल हे ‘सार्वमत’च्या पत्रकारितेचे ठळक बलस्थाने आहेत. 50 वर्षांच्या वाटचालीत दैनिकाने वाचक आणि पत्रकारांच्या पिढ्या घडविण्याचे काम केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील मातीच्या प्रश्नांशी घट्ट नाळ हाच ‘सार्वमत’ने हाताळलेल्या प्रश्नांचा समान धागा आणि आत्माही आहे. म्हणूनच ‘सार्वमत’ सर्वार्थाने सामान्य-कष्टकरी जनतेच्या जीवनातील अविभाज्य घटक ठरला. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे एकमेव स्थानिक मुखपत्र म्हणून सुवर्ण महोत्सवी टप्पा ओलांडताना जबाबदारीच्या जाणीवेसह पुढील वाटचालीसाठी ‘सार्वमत’ सज्ज आहे.
‘सार्वमत’चा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना जानेवारी 2026 पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध विषयांवरील परिसंवाद, मेळावे आणि विशेषांकांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या प्रसारासाठी ‘सार्वमत’ला संवेदनशील अभिनेते मिलिंद गुणाजी यांची साथ लाभली आहे. या काळात आयोजित काही निवडक उपक्रमांत ते प्रत्यक्ष सहभागी होणार असून वाचकांशी संवाद साधणार आहेत.

पपीहा, फरेब ते भटकंती…
चतुरस्त्र अभिनेते म्हणून मिलिंद गुणाजी चित्रपट रसिकांना परिचित आहेत. पपीहा चित्रपटापासून कारकिर्दीचा प्रारंभ केल्यानंतर फरेब, द्रोहकाल, विरासत, देवदास, देव, लाईन ऑफ कन्ट्रोल: कारगील, फिर हेराफेरी, पानीपत यासह हिंदी, मराठी, तेलगू, तमीळ, कन्नड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला. 250 हून अधिक चित्रपट, टिव्ही मालिकांमधून अभिनय करण्यासोबत ‘भटकंती’साठी ते विशेष लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील गड, किल्ले, जंगल पालथी घालण्यासोबत त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान उलगडण्याचे त्यांचे कसब प्रेक्षक-वाचकांच्या मनात घर करणारे ठरले. प्रवास वर्णनविषयक टिव्ही मालिका ‘भटकंती’ ही त्यांची खास ओळख! प्रवास वर्णनविषयक त्यांची 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पर्यटन, वन्यजीव, पर्यावरण संवर्धन चळवळींशी ते निगडीत आहेत.

‘सार्वमत’ हे सर्वार्थाने वाचकांचे वर्तमानपत्र आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना वाचकांशी असलेल्या नात्याची नाळ घट्ट होईल, यात दुमत नाही. सुवर्ण महोत्सवी उपक्रमांच्या प्रसारासाठी मिलिंद गुणाजी यांची प्रतिमा निश्चितच मोलाची ठरेल.
– विक्रम सारडा, चेअरमन, सार्वमत-देशदूत समूह.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...