कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दैनिक सार्वमत यंदा वाटचालीचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ उद्या, 31 जुलै रोजी सहकार मंथन परिषदेपासून होत आहे. कोपरगाव येथील कृष्णाई बँक्वेट सभागृहात सकाळी 11 ते 2 या वेळेत निमंत्रितांच्या उपस्थितीत परिषद व विशेषांक प्रकाशन सोहळा होणार आहे.
26 जानेवारी 1976 रोजी स्थापना झालेल्या दैनिक सार्वमतने यंदा 26 जानेवारी रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांनी हा उत्सव साजरा होत आहे. 2025 संयुक्त राष्ट्र संघाकडून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची घोषणा करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकाराची जननी आणि ताकद म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गेली 50 वर्षात दैनिक सार्वमतने वाचकांच्या मनातील अढळ स्थान कायम राखले आहे.
आंतराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सार्वमतचा सुवर्ण महोत्सव याचे औचित्य साधून होत असलेल्या ‘सार्वमत सहकार मंथन’ या परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रमभाऊ सारडा, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार आशुतोष काळे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. यावेळी सार्वमत सुवर्ण महोत्सवनिमित्त माहितीपट व ‘सहकार मंथन’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.




