कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळमध्ये (Gokul Milk) महायुतीची (Mahayuti) सत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने ५ नामनिर्देशित संचालक वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून, यामुळे सहकार क्षेत्रात मोठा वादंग उठला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी महायुती आणि काँग्रेस आमनेसामने आले असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत या राजकारणाचे पडसाद उमटत आहेत. यावर आज (दि.०५ रोजी) काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकेची झोड उठवली.
यावेळी ते म्हणाले की, “काल कॅबिनेटने घेतलेला निर्णय हा लोकशाही आणि जनतेचे मत संपवणारा असून हा काळा दिवस आहे. गोकुळला केंद्रबिंदू मानून निर्वाचित संचालक घुसवणारा हा कायदा तयार करण्यात आला आहे. यात साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ फेडरल इन्स्टिट्यूट असलेल्या गोकुळलाच टार्गेट करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला. तसेच, कोल्हापूरच्या जनतेने दिलेल्या बहुमताला सरकारतर्फे केराची टोपली दाखवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा अपमान; ९ रोजी भव्य संघर्ष मोर्चा
पुढे ते म्हणाले,”जनतेने नाकारलेल्या लोकांना तज्ज्ञ म्हणून घुसवून सरकारने कोल्हापूरकरांचा अपमान केला आहे. न्यायालयीन लढाईसोबतच याविरोधात तीव्र लढा दिला जाईल, असे जाहीर करत त्यांनी येत्या ९ तारखेला सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून कोल्हापूरच्या (Kolhapur) स्वाभिमानाचा असल्याचे सांगत नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे”, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार आणि गोकुळचे महत्त्व
गोकुळ दूध संघावर राज्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार अवलंबून असल्याचे सांगत आमदार सतेज पाटील म्हणाले की, “या संघाकडून रोज २० लाख लिटर दूध गोळा होते आणि दर १० दिवसांनी शेतकऱ्यांना १०० कोटी रुपये त्यांच्या कष्टाचे दिले जातात. अमूलनंतर देशातील हा सर्वात मोठा दूध उत्पादक संघ आहे. हा संघ शेतकऱ्यांचाच राहावा यासाठी आमचा लढा सुरू आहे, मात्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे”, असे त्यांनी म्हटले.
मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांवर थेट आरोप
नियम बदलून ५ संचालक घुसवण्याच्या या संपूर्ण षडयंत्रात मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतल्याचा थेट आरोप सतेज पाटील यांनी केला. कायदा करताना पूर्वलक्षी प्रभावाचा वापर कसा केला जाऊ शकतो? असा रोकडा सवालही त्यांनी विचारला. या प्रकरणी राहुल गांधी यांनी देखील भाजपचा समाचार घेतला असून, शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र सत्ता मिळवण्यासाठी असे निर्णय घेत असल्याचा आरोप केला जात आहे.



