अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात आतापासून निर्णय झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून यात माणसांच्या पाण्याच्या व्यवस्थेसह आता जनावरांच्या पाण्याचा ताळेबंद तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने आधी तयार केलेल्या 250 कोटींच्या आराखड्यात आणखी 10 कोटींची वाढ होणार आता जिल्ह्यात पुढील जूनपर्यंत 260 कोटी रुपयांचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. उन्हाळ्यापूर्वीच संभाव्य टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने महिनाभरापासून नियोजन सुरू केले आहे. जानेवारी, मार्च आणि त्यानंतर जून 2027 पर्यंतच्या संभाव्य खर्चाचा टप्प्याटप्प्याने अंदाज घेऊन उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्याबरोबरच अस्तित्वातील जलस्रोत टिकविणे आणि पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी 2018-19 मध्ये सर्वाधिक 815 पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदा हा विक्रम मागे पडण्याची शक्यता असून, संभाव्य टँकरची संख्या एक हजाराच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षात किती गावांना आणि वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, हे आगामी काळातील पर्जन्यमान, भूजलाची स्थिती आणि उपलब्ध जलसाठ्यांवर अवलंबून राहणार आहे.
गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या उपस्थितीत टंचाईकृती आरखडा नियोजन बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेने तयार केलेला 250 कोटींचा आराखडा सादर करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकारी यांनी या आराखड्यात माणसांप्रमाणे जनावरांच्या पाण्यासाठी तरतूद करण्याची सुचना केली. त्यानूसार आता आराखड्यात आणखी दहा कोटींची वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, टंचाई आराखड्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर जिल्हाधिकार्यांची मान्यता आणि निधी उपलब्धतेनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.
आराखड्यात 50 कोटी जलस्रोतांसाठी ?
यंदाच्या टंचाई आराखड्यातील एकूण तरतुदीच्या 20 टक्के रक्कम पाण्याचे स्रोत बळकटीकरणासाठी राखून ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आराखड्याचे बजेट 250 कोटी रुपये झाल्यास सुमारे 50 कोटी रुपये या कामांसाठी उपलब्ध होऊ शकतात. आराखडा 200 कोटी रुपयांचा असल्यास ही तरतूद 40 कोटी रुपये असेल. जलस्रोत बळकटीकरणामुळे पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर करण्यास मदत होऊ शकते. मात्र, यंदा टँकरवरील संभाव्य खर्च, विहिरींचे खोलीकरण, पाणी योजनांची दुरुस्ती आणि नव्या उपाययोजनांसाठी किती निधी प्रत्यक्ष मंजूर होतो, याकडे लक्ष लागले आहे.
आराखड्याती प्रमुख तरतुदी
टॅकरची संख्या ही अंदाज 900 च्या जवळपास गृहीत धरण्यात आलेली असून त्यावर 169 कोटी खर्च प्रस्तावित
पाण्याचे स्रोत बळकटीकरण 103 उपाययोजना आणि 5 कोटी 37 लाख.
पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे 218 उपाययोजन आणि 7 कोटी 90 लाख
आवश्यकतेनुसार खासगी विहिरींचे अधिग्रहण 249 उपाययोजना आणि 3 कोटी 16 लाख.
प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजना वेगाने पूर्ण करणे 51 योजना आणि 6 कोटी 98 लाख
नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती.
बंद किंवा नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्ती 210 उपाययोजा आणि 58 कोटी.
आवश्यक ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेणे 107 उपाययोजना आणि 2 कोटी 23 लाख
तात्पुरत्या पूरक नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती 49 उपाययोजना 4 कोटी 85 लाख




