अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात निर्माण होणार्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ऑक्टोबर 2024 ते जून 2025 या कालावधीत राबवण्यात येणार्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.
मंगळवार (दि. 21) रोजी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या टंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली. यंदा मुबलक पावसानंतरही उन्हाळ्यात ऐनवेळी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून 40 कोटी 74 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. या टंचाई आराखड्यात ऑक्टोबर 2024 ते जून 2025 या कालावधीत 643 गावांत आणि 2415 वाड्यांवर पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या ठिकाणी 776 उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत आराखड्यातील पहिला टप्पा राबविण्यात आला. आता जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात 229 गावात आणि 500 एक वाड्यांवर पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या ठिकाणी 167 उपाययोजना सुचवण्यात आल्या असून या कालावधीत टंचाई निवारणार्थ 5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. आराखड्याच्या तिसर्या टप्प्यात एप्रिल ते जून 2025 या कालावधीत 597 गावात आणि 2 हजार 369 वाड्यावर पाणीटंचाई होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या ठिकाणी 691 उपाययोजना सुचवण्यात आले असून त्यासाठी 30 कोटी 75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेल्या आराखड्यात बुडक्या खोदणे, सार्वजनिक विहीर खोलीकरण अथवा गाळ काढणे, खाजगी विहिरी अधिकृत करणे, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, प्रगतीपथावरील नळ पाणी योजना गतीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन इंधनविहीरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना आधी उपाययोजनांचा समावेश आहे.
अशी आहे तरतूद
3 गावात आणि 4 वाड्यांवर पाच ठिकाणी बुडक्या खोदण्यात येणारा सून त्यासाठी 6 लाख, विहीर खोलीकरण व गाळ काढणे यासाठी 15 गावे आणि 29 वाड्यांवर 15 उपाय योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी 44 लाख, 78 गावे आणि 70 वाड्यावर खाजगी विहिरी अधिगृहणकरणे, पाण्याचे टँकर भरण्यासाठी 40 गावे आणि 42 वाड्या या ठिकाणी 84 उपाय योजना सुचवण्यात आल्या असून त्यासाठी एक कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 496 गावे 224 वाड्या येथे 531 रुपये योजना सुचवण्यात आल्या आहेत. यासाठी 33 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विंधन विहीरी योजना दुरुस्तीसाठी 5 लाख 22 हजारांची तरतूद करण्यात आली असून 5 गावे 5 वाड्या या ठिकाणी 9 उपाय योजना राबविण्यात येणार आहे. तसेच सात ठिकाणी तात्पुरत्या पूरक नळ योजना हाती घेण्यात येणार असून त्यासाठी 17 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.