
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच, तालुक्यातील विविध शाळांनी प्रवेश प्रक्रियेला वेग दिला असून, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शाळेत प्रवेश घ्या, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार आणि खेळाला प्राधान्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी शिक्षकवर्ग अशा विविध घोषणांसह शिक्षक गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
सध्या ग्रामीण भागात सकाळपासूनच शिक्षकांचे गट हातात प्रवेशपत्रके, माहितीपत्रके आणि शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन फिरताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पालकांच्या घरी भेट देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे, तर काही ठिकाणी शाळेतील सुविधा, डिजिटल शिक्षण, क्रीडा साहित्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इंग्रजी माध्यमाची उपलब्धता यांची माहिती देत आपल्या शाळेची वैशिष्ट्ये पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भर उन्हामध्ये पायपीट करत शिक्षकांकडून सुरू असलेली ही प्रवेश मोहीम अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास शाळेचा दर्जा टिकून राहतो, शिक्षकांच्या पदांवर परिणाम होत नाही, तसेच विविध शासकीय योजनांचाही लाभ मिळतो, या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळा अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक आजही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळेच्या शोधात असतात. याच गोष्टीचा विचार करून काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके, गणवेश, वाहतूक सुविधा, डिजिटल क्लासरूम, संगणक शिक्षण यांसारख्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वाढती स्पर्धा लक्षात घेता काही शाळांकडून आकर्षक आश्वासने दिली जात असल्याची चर्चा देखील पालकांमध्ये सुरू आहे. आमची शाळा सर्वोत्कृष्ट, शंभर टक्के निकाल, अनुभवी शिक्षकवर्ग अशा दाव्यांमुळे पालक संभ्रमात पडत असल्याचे चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांनी केवळ जाहिरातींवर विश्वास न ठेवता शाळेची प्रत्यक्ष पाहणी करूनच आपल्या पाल्याच्या भवितव्याचा निर्णय घ्यावा, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. एकूणच, नवीन प्रवेशासाठी सुरू असलेली ही स्पर्धा आता ग्रामीण भागातही तीव्र झाली असून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच प्रत्येक शाळेचे खरे ध्येय असले पाहिजे, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
प्रवेशासाठी स्पर्धा की गुणवत्तेची चाचणी ?
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी मोठी चुरस सुरू झाली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक गावोगावी जाऊन प्रचार करत असले तरी, शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांचा विकास आणि शाळेतील प्रत्यक्ष सुविधा यालाच अधिक महत्त्व दिले जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. केवळ आकर्षक आश्वासनांपेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे ही काळाची गरज असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.




