दहिवड |मनोज वैद्य| Dahiwad
आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी वाखारी देवळा रस्त्यावर चांदवड (Chandwad) येथील विद्यालयाची स्कूल बस व वाखारी येथील दुचाकी यांच्यात भीषण अपघात (Accident) होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, सदर घटनेने संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाखारी देवळा रस्त्यावर कर्ले नाल्याच्या अलीकडे, दत्तनगर जवळ देवळ्याकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेल्या स्कूलबस क्रमांक एम एच 08 ए पी 4148 या वाहनाने रॉंग साईटने जात समोरून कापराई शिवार वाखारी येथून देवळ्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच 41 बी क्यू 3984 यास जबरदस्त धडक दिली, त्यात वाखारी येथील मनोज दिलीप जगदाळे वय 24 हा तरून जागीच ठार (Death) झाला. मनोज हा अतिशय मनमिळावू व होतकरू तरुण असल्याने त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली.
या घटनेबाबत मृताचे काका भारत चिमन जगदाळे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक समाधान धुळाजी व्हलगडे राहणार चांदवड यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125 ब, 324 (4)(5), मोटर वाहन कलम 134 / 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोनवणे हे करीत आहेत.
मयत मनोज यांच्या वडिलांचे देखील मागील काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून वाखारी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.