Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशास्त्रज्ञाला ७८ लाखांचा गंडा

शास्त्रज्ञाला ७८ लाखांचा गंडा

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

पुण्यातील प्रतिष्ठित प्रयोगशाळेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून तब्बल ७८ लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनी लाँडरिंगच्या बनावट प्रकरणात तुरुंगात टाकण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका प्रसिद्ध महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून ही फसवणूक केली आहे.

या प्रकरणातील पीडित शास्त्रज्ञ हे ५० वर्षांचे असून, काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून वारंवार फोन येत होते. अखेर त्यांनी फोन उचलला असता, समोरच्या व्यक्तीने आपण बेंगळुरूच्या अशोक नगर पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर संदीप दिवाण असल्याचे सांगितले. शास्त्रज्ञांच्या ओळखपत्राचा वापरकरून मनी लाँडरिंगसाठी काही बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि हे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे, अशी बतावणी या भामट्याने केली.

या घटनेच्या दोन दिवसांनंतर शास्त्रज्ञाला व्हॉट्सपवर एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर पोलीस गणवेशातील एक महिला एका अधिकृत केबिनमध्ये बसलेली दिसत होती. तिने आपली ओळख बिहार केडरच्या प्रसिद्ध आयपीएस अधिकारी नवजोत सिमी अशी करून दिली. प्रत्यक्षात, सायबर गुन्हेगारांनी
सिमी यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांच्या नावाचा गैरवापर केला होता. या महिलेने शास्त्रज्ञाला सांगितले की त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे. आणि लवकरच त्यांनाघरातून अटक करून तुरुंगात धाडले जाईल. या कथित प्रकरणातून नाव काढून टाकण्यासाठी त्यांना ७५
लाख रुपये भरावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.

घाबरलेल्या शास्त्रज्ञाने आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितले, मात्र गुन्हेगारांनी त्यांना सात दिवसांची मुदत दिली. तसेच, दिवसातून कधीही फोन केल्यावर त्यांना आपले लोकेशन व्हेरिफाय करण्याची सक्ती करण्यात आली. सुरुवातीला शास्त्रज्ञाने ७ लाख रुपये एका बँक खात्यात जमा केले, जे सरकारी खाते असल्याचा दावा गुन्हेगारांनी केला होता. मात्र, एवढे पैसे पुरेसे नसल्याचे सांगत त्यांना पुन्हा तुरुंगवासाची भीती दाखवण्यात आली. अखेर, आपली सुटका करून घेण्यासाठी शास्त्रज्ञाने बँकेतून इन्स्टंट लोन घेतले, सोन्यावर कर्ज काढले आणि मित्र-नातलगांकडूनही पैसे उसने घेतले. अशा प्रकारे सहा वेगवेगळ्या
व्यवहारांतून त्यांनी एकूण ७८ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले.

पैसे दिल्यानंतर जेव्हा शास्त्रज्ञाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली दाम्पत्याला साडेचार लाखांचा गंडा;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या एका हायप्रोफाईल 'बंटी-बबली'चा कारनामा नाशिकमध्ये (Nashik)...