अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तांबे व अॅल्युनिमीअम स्क्रॅपची बेकायदेशीर वाहतूक करणार्या चालकासह एक कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 1 कोटी 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथून दिल्लीकडे भंगार माल बेकायदेशीरपणे वाहतूक करून नेला जात असून सदर कंटेनर (आरजे 09 जीडी 3605) सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ संशयीत कंटेनर ताब्यात घेतला. चालक शैलेंद्र सोरन सिंह (वय 45, रा.स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) यांच्याकडे चौकशी केली असता त्याने अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती दिली. पथकाने अधिक तपासणी केल्यावर मालाचे बिल व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल यात तफावत आढळून आल्याने चालकाला ताब्यात घेण्यात आले.
तसेच, 30 लाख रुपये किंमतीचे टाटा कंपनीचे कंटेनर, 1.08 कोटींचे 18 टन तांबे व ल्युमिनीअम धातुचे भंगार जप्त करण्यात आले. ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल (रा.पुणे, पसार) याच्या सांगण्यावरून पुरवठादार एच. एस. ट्रेडींग कंपनी (सदयंकुप्पम, तामीळनाडू) यांच्याकडून मालापैकी तांब्याचे पाईप असलेले बंडल हे बब्बु (पुर्ण नाव माहिती नाही) व बब्बु याचा मित्र यांनी (वाघोली, जि.पुणे) येथून कंटेनरमध्ये भरून दिल्याचे चालकाने सांगितले. या प्रकरणी पाचही जणावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.